भरवेगात जाणार्‍या डंपरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

Mumbai
accident
अपघात

भरवेगात जाणार्‍या एका डंपरची अ‍ॅक्टिव्हाला धडक लागून झालेल्या अपघातात मोहम्मद अहमद अफजल खान या 18 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अपघाताची नोंद करुन काळाचौकी पोलिसांनी आरोपी डंपरचालक लिंगप्पा भुटाली बालबुट्टी याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजता चिंचपोकळी येथील डॉ. बी. ए रोडवरील चैत्य 777 इमारतीसमोरील उत्तर वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद अफजल अब्दुल माजिद खान हे माझगाव परिसरात राहत असून त्यांचा मोहम्मद अहमद हा मुलगा आहे.

शनिवारी सकाळी दहा वाजता तो त्याच्या कंपनीचा मालक राजेश राठोड याची अ‍ॅक्टिव्हा घेऊन कामावर निघून गेला होता. दुपारी दिड वाजता तो जेवणासाठी घरी येत होता. ही अ‍ॅक्टिव्हा चेत्य 777 इमारतीसमोरुन जात असताना एका भरवेगात जाणार्‍या डंपरने त्याच्या अ‍ॅक्टिव्हाला जोरात धडक दिली होती. त्यात मोहम्मद अहमद हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला तातडीने पोलिसांनी केईएम रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मोहम्मद अफजल खान यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चालक लिंगप्पा बालबुट्टी याला अटक केली. तो नवी मुंबईत राहत असून याच गुन्ह्यांत त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.