घरताज्या घडामोडी'कोरोना'ने मिळून दिली इज्जत अन् हिंमतही

‘कोरोना’ने मिळून दिली इज्जत अन् हिंमतही

Subscribe

धारावी सारख्या परिसरात चिटपाखरु येण्यास तयार नव्हते, त्या काळात मी माझ्या परिसरात मनापासून काम केले. धारावीचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करुन मी कामाला दाखल व्हायची. पण, घरी जाताना मनात कोणतीही भीती नव्हती की, मी आता घरी कोरोना तर नाही ना घेऊन जात आहे. कारण कोरोनाने एक वेगळी हिंमत मिळवून दिली, एक वेगळेच बळ मला मिळाले.

कोरोना योद्धा म्हटलं का डोळ्यासमोर येणारे डॉक्टर, नर्स आणि पोलीस कर्मचारी. जे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर होते आणि अजूनही आहेत. मात्र, असा एक सच्चा कोरोना योद्धा जो नेहमी आपल्यासाठी रस्त्यावर राहून काम करतो आणि आपल्या सुरक्षेची जबाबदारी ज्याच्या हातात असते असा सच्चा कोरोना योद्धा म्हणजे ‘सफाई कामगार’.

- Advertisement -

कोरोनाने दिली जगायची हिंमत

‘पहाटेचा काळाकूट अंधार आणि भयाण शांतता. याच शांततेत घराबाहेर पडत लोकल पकडण्याची धावपळ, असा गेल्या १८ वर्षांपासूनचा मी प्रवास करतं आहे. रस्त्याला कोणतेही चिटपाखरु नसताना आणि लोक साखर झोपेत असताना माझा पनवेल ते धारावी प्रवास सुरु होतो. नंतर धारावी गाठले की, दोन हातात हँडग्लॉज आणि क्लिनअपचे जॅकेट चढवून हातात झाडू घेऊन कामाला सुरुवात करते. गेल्या १८ वर्षांपासून हा प्रवास असाच सुरु आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यात जगण्याची काही वेगळीच हिंमत आली आहे. ही हिंमत मिळाली ती म्हणजे ‘कोरोना’ या विषाणूमुळे.

कोणासाठी कोरोना हा शेवटचा पॉईंट ठरला तर माझ्यासाठी मात्र, टर्निंग पॉईंट ठरला. कोरोनाने जगण्याची एक वेगळी हिंमत दिली. ज्या कोरोना काळात आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी सारख्या परिसरात चिटपाखरु येण्यास तयार नव्हते, त्या काळात मी माझ्या परिसरात मनापासून काम केले. धारावीचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करुन मी कामाला दाखल व्हायची. पण, घरी जाताना मनात कोणतीही भीती नव्हती की, मी आता घरी कोरोना तर नाही ना घेऊन जात आहे. कारण कोरोनाने एक वेगळी हिंमत मिळवून दिली होती. ज्या काळात आपल्यासोबत कोणी नसतं त्या काळात एक वेगळी एनर्जी मिळते. तिच एनर्जी, तिच हिंमत बाळगून आतापर्यंत मी काम करत आहे. कोरोना काळात सगळे घरात असल्याने एक वेगळेच बळ मला मिळाले. जे बळ आता मला आयुष्यभरासाठी कामी येणार आहे’, हे बोल आहेत शोभा काळे या महिला सफाई कामगाराचे.

- Advertisement -

सफाई कामगार म्हणून अपमानास्पद वागणूक महाराष्ट्रातील शहरांचा विकास झाला, नवे उद्योग वाढले, जीवनमान सुधारले पण, शहरांच्या स्वच्छतेसाठी आरोग्य विभागातील सफाई कामगारांकडे पाहण्याचा मात्र दृष्टीकोन काही बदला नसल्याचा मला अनुभव आला. मी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मुलीच्या घरी राहत आहे. सुरुवातीला सगळे चांगले चाले होते. मात्र, त्यात कोरोना सारखी महामारी आली आणि संपूर्ण चित्रच बदलून गेले. लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला.

मी अंधेरी येथे माझ्या मुलीच्या घरी राहते. कोरोना काळात मला माझ्या कामाबाबत अत्यंत वाईट आणि अपमानास्पद अशी वागणूक मिळाली. म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी, तसेच काहीसे माझ्या बाबतीत झाले. मी सफाई कामगार म्हणून काम करते हे शेजारी राहणाऱ्यांना माहित आहे. त्यात मी धारावी सारख्या परिसरात काम करत असल्याने माझ्याकडे पाहण्याची लोकांची मानसिकता खूपच खालावी. ‘ही सफाई कामगार आहे. कुठे कुठे जाते काम करायला काय माहित? त्यात ती धारावी सारख्या झोपडपट्टीत काम करते. हिला इमारतीत घेऊ नका. तिला सांगा तुझ्यामुळे आम्हाला देखील कोरोनाची लागण होईल’, असे एक ना अनेक आरोप माझ्यावर करण्यात आले.

दरम्यान, या काळात माझा जावई माझ्या मुलाप्रमाणे माझ्या पाठीशी उभा राहिला. आई तुमचे काम आहे. तुम्ही घाबरु नका. काम करा. कोणीही काही बोलो. तुम्ही तुमचे काम करताय. तुम्ही तुमच कर्तव्य बजावा. लोक बोलतील गप्प राहतील. पण, आज तुमच्या आणि तुमच्या सहकार्यांमुळे आम्ही स्वच्छ शहरात राहत आहोत. हे ऐकल्यानंतर मला काम करण्याचा अधिकच उत्साह आला आणि मी माझ्या कामाला अधिक जोमात सुरुवात केली. पण, या काळात आपले कोण हे मला कळले, असे मत विजय घेवदे यांनी व्यक्त केले.

धारावीची रहिवाशी असल्याचा अभिमान

मी माझ्या नवऱ्याच्या जागेवर गेल्या पाच वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करत आहे. मी धारावी या परिसरात राहत असून मी धारावीची रहिवासी असल्याचा मला अभिमान आहे. ज्या धारावी परिसराला नेहमी हिन वागणूक दिली जाते. त्याच परिसरातील नागरिकांनी कोरोना सारख्या महामारीवर मात केली आणि कोरोना रोखण्याच्या पॅटर्नचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले.

धारावी येथे कोरोनाचे पहिले प्रकरण समोर येण्यापूर्वी सरकारला भीती वाटली की इथली परिस्थिती बिघडू शकते. कारण ८० टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. त्यात लहान घरात १० ते १५ लोक राहतात. त्यामुळे लोक सामाजिक अंतर ठेऊ शकत नव्हते. मात्र, असे असले तरी धारावीतील नागरिकांनी नियमांचे पालन करुन कोरोनावर मात केली आणि धारावी परिसर कोरोनामुक्त केला. त्यामुळे मला मी राहत असलेल्या परिसराचा अभिमान असल्याचे दुर्गम्मा कुंचिकोरवे यांनी सांगितले. अशा या सच्चा कोरोना योद्धांना आपलं महानगरकडून मानाचा मुजरा!

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -