Navratri 2020: देवींचे नऊ अवतार,नऊ रंग

नवदुर्गांच्या आवडत्या रंगांचा उल्लेख हा पुराणात करण्यात आला आहे.

Nine colors of Navratri
Navratri 2020: नवरात्रीचे नऊ रंग आणि रंगाचे महत्त्व
हिंदु संस्कृतीत नऊ या संख्येला विशेष महत्त्व आहे जसे नवविधा भक्ती, नवग्रह, नवरस, नवरात्री आणि नवदुर्गा! नवदुर्गा हे दुर्गा देवीचे नऊ अवतार. दुर्गेच्या नऊ रुपांतील शक्तीची उपासना यांतील प्रत्येक रूपाचे वैशिष्ट्य आहे. यांस मातृदेवतांचा समूह असेही म्हटले जाते. आगम ग्रंथामध्ये नवदुर्गेची नावे दिली आहेत.
पहिली देवी – शैलीपुत्री

नवरात्रीचा पहिल्या दिवस शैलीपुत्री देवीचा मानण्यात येतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलीपुत्री देवीची उपासना करण्यात येते. हिमालयाची कन्या आणि पूर्वजन्मीची दशपुत्री-सती म्हटले जाते.शैलीपुत्री देवीला नारंगी रंग आवडतो. जास्वंदीचे फुल तिला आतिशय प्रिय आहे.म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नारंगी रंगाचे वस्र परिधान केले जातात.

 

दुसरी देवी – ब्रम्हचारिणी


नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारी अशी हि देवी. या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. तप, संयम आणि त्यागासाठी हि देवी प्रसिद्ध आहे. पांढरा रंग तिला अतिशय प्रिय आहे. पांढरा रंग संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. म्हणून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्र परिधान केले जातात.

तिसरी देवी – चंद्रघंटा


नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीची उपासना करतात. डोक्यावर घंटेप्रमाणे चंद्र धारण करणारी. या देवीचा आवडता रंग लाल आहे. लाल रंग आयुष्यात आनंद आणि उत्साही राहण्यासाठी लाल रंगाचे विशेष महत्त्व आहे. लाल रंग हा पराक्रमाचे प्रतिक आहे. म्हणून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लाल रंगाचे वस्र परिधान करतात.

चौथी देवी – कुष्मांडा  


नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते. आपल्या मंद हास्यातून विश्वाची निर्मिती करणारी कुष्मांडा देवी. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीने ब्रम्हांडाची रचना केली अशी आख्यायिका आहे. सुखकारक असा गडद रंग या देवीचा आवडता रंग आहे. म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्र परिधान केले जातात.

पाचवी देवी – स्कंदमाता


नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे  पुजन केले जाते. स्कंदमाता म्हणजेच भगवान कार्तिकेयची आई या देवीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. पिवळा रंग उत्साह आणि चैतन्याचे प्रतिक आहे. देवीच्या पुजेसाठी पांढरी फुले वापरली जातात. म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्र परिधान करतात.

सहावी देवी – कात्यायिनी 


नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायिनी देवीची पुजा केली जाते. असुरांच्या वधासाठी हाती चंद्रहास तलवार धारण करणारी काव्ययन ऋषींची पुत्री. षष्ठीच्या दिवशी या देवीची पुजा केली जाते.अविवाहित मुलींसाठी हि देवी वरदान आहे. या देवीला हिरवा रंग अतिशय प्रिय आहे. म्हणून या दिवशी हिरव्या रंगाचे वस्र परिधान केले जातात.
सातवी देवी – काळारात्री

नवरात्रीच्या सातव्या दिवशी  काळारात्री देवीची पुजा केली जातात. रौद्र स्वरूप. उग्र संहारक अशी तामसी शक्ती असलेली हि देवी आहे. हि देवी दिसायला भयानक असली तरी तिला नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. या देवीला करडा रंग प्रिय आहे. म्हणून नवरात्रीच्या सातव्या दिवशी करड्या म्हणजेच राखाडी रंगाचे कपडे परिधान केले जातात.

आठवी देवी – महागौरी


नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते. गौर वर्ण असलेल्या या देवीला जांभळा रंग प्रिय आहे. जांभळा रंग शांती आणि समाधानाचे प्रतिक मानले जाते. आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्या मिळावं म्हणून अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते.

 

 नववी देवी – सिद्धिदात्री


नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पुजा केली जाते. गौर वर्ण असलेली. तिला मोरपिसी रंग अतिशय प्रिय आहे.आपल्या भक्तांना सिद्धी प्राप्त करून देणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे.
देवींच्या आवडत्या रंगांचा उल्लेख पुराणात करण्यात आला आहे. मात्र हल्ली ट्रेंड नुसार नवरात्रीचे रंग बदलतात.