Navratri 2020 : नवरात्रौत्सवासाठी खास नऊ रंगाचे मास्क!

नवरात्रौत्सवात नऊ दिवस नऊ विविधी रंगाचे वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी या नऊ दिवसांतील नऊ रंग वेगवेगळे असतात. यंदाही नवरात्रीतील नऊ दिवसांचे रंग ठरले असून त्या त्या दिवसानुसार महिला ठरलेल्या रंगाच्या साड्या, ड्रेस परिधान करत आहेत. मात्र सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव धुमधडाक्यात साजरा होत नसला तरीही आपल्या घट बसवून, देवीला विराजमान करून, नवरात्रीचे उपवास करून हा सण साजरा होत आहे. अशातच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क परिधान करणे बंधनकारक असल्याने महिलांमध्ये नऊ दिवस नऊ रंगाचे मास्क परिधान करण्याचाही ट्रेंड पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी बाजारांमध्ये या ठरलेल्या नऊ रंगांचे मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यंदाच्या वर्षी पहिल्या दिवसापासून राखाडी, केशरी, पांढरा, लाल, निळा, पिवळा, गिरवा, जांभळा आणि गुलाबी हे अनुक्रमे नऊ दिवसांचे रंग आहेत. त्यानुसार बाजारात या नऊ रंगाच्या मास्कचे सेट महिलांकरता विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच काहींना यातील ठरावीच रंगाचे मास्क हवे असतील तर तेही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रामुख्याने बाजारात असे मास्क विक्रीसाठी ठेवले असल्याचे पाहायला मिळते. त्याशिवाय सध्या ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढल्याने अनेकांनी हा नऊ रंगांच्या मास्कचा सेट ऑनलाईन विक्रीसाठीही उपलब्ध केल्याचे पाहायला मिळते. साधारणा या मास्कची किंत प्रति १५ रुपयांपासून ते सजावट केलेले ६० रुपयांपर्यंत पाहायला मिळते. परंतू नऊ मास्क एकत्र घ्यावयाचे असल्यास ते २५० ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध केले आहेत. तर एखाद दुसरा मास्क म्हणजे सिंगल पीस हा ४० ते ५० रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

सध्याच्या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात होणारा गरबा, दांडिया यंदा रद्द करण्यात आल्याने गरबाप्रेमींची काहीशी निराशा झाली आहे. मात्र घरात देवीसमोर गरब्याचा फेर धरताना किंवा नवरात्रौत्सवानिमित्त कुटुंबिय, मित्रमैत्रिणींची भेट घेताना नऊ रंगाच्या पौषाखावर हे मास्क परिधान केले जाऊ शकतात. कोरोनाच्या काळात हा कलरफुल मास्कचा आगळा वेगळा ट्रेंड यंदा पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: राजगिऱ्याचे थालीपीठ