घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबळीराजाची फसवणूक करणाऱ्यांना लगाम

बळीराजाची फसवणूक करणाऱ्यांना लगाम

Subscribe

उत्तर महाराष्ट्रातील अकराशे शेतकर्‍यांना मिळाले पाऊणेसात कोटी, विशेष पोलीस महानिरीक्षकांमुळे मिशन फत्ते

शेतकर्‍यांचा माल घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करण्याच्या १ हजार १९२ प्रकरणांत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या दणक्यानंतर तब्बल १९९ व्यापार्‍यांनी तीन महिन्यांत ६ कोटी ७५ लाख ८८ हजार ९८ रुपये दिले असून, उर्वरित ५ कोटी ८४ लाख ४५ हजार ६१० रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. असे एकूण शेतकर्‍यांना पोलिसांच्या मध्यस्तीमुळे १२ कोटी ६० लाख ३३ हजार ७०८ रुपये मिळणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, डाळिंब, केळी, डाळींचे उत्पादन करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. द्राक्ष, कांदा खरेदीसाठी व्यापारी मोठ्या संख्येने नाशिकमध्ये येतात. त्यात काही व्यापारी शेतकर्‍यांचा माल घेऊनही पैसे देत नाहीत. काही प्रकरणात व्यापारी धनादेश देतात, ते वटत नाही. शेतपिके खरेदी करुन त्याचा मोबदला न देता फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी पोलीस अधिकार्‍यांना सप्टेंबर २०२० मध्ये दिल्या. व्यापार्‍याने पैसे अदा केले नाही तर त्यांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. दिघावकर यांनी दिला होता. १० सप्टेंबर ते १४ डिसेंबर २०२० या तीन महिन्यात उत्तर महाराष्ट्रातील १ हजार १९२ शेतकर्‍यांनी फसवणुकप्रकरणी व्यापार्‍यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या दणक्याने व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या दणक्यानंतर २०० प्रकरणात व्यापार्‍यांनी तडजोड करत शेतकर्‍यांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये जळगाव ३, नाशिक 183, धुळे २ आणि नंदुरबारमध्ये २ प्रकरणांचा समावेश आहे.

- Advertisement -

१९१ व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल

शेतकर्‍यांच्या शेतमालाची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या १९१ व्यापार्‍यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अहमदनगर ९,नाशिक १८१, धुळे एक आणि नंदुरबारमध्ये १४ गुन्हे दाखल झाले आहेत.आतापर्यंत व्यापार्‍यांनी ६ कोटी ७५ लाख रुपये शेतकर्‍यांना दिले असून, उर्वरित ५ कोटी ८४ लाख ४५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -