Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र संगमनेर-अकोले पोलीस निरीक्षकांना लाचखोरी भोवली

संगमनेर-अकोले पोलीस निरीक्षकांना लाचखोरी भोवली

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर संगमनेरात येताच कारवाई

Related Story

- Advertisement -

संगमनेर आणि अकोले पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची लाचखोरीची प्रकरणे दोन्ही पोलीस ठाण्यात नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांना भोवली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर मंगळवारी संगमनेरात आले असताना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर शहरचे निरीक्षक मुकूंद देशमुख आणि अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे.

महिनाभराच्या कालावधीत संगमनेर आणि अकोले पोलीस ठाण्यात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग तीन छापे टाकत एका उपनिरीक्षकांसह दोन पोलीस कर्मचार्‍यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. यातील दोन छापे तत्कालिन पोलीस निरीक्षकांच्या काळात संगमनेर, अकोलेत झाल्याने त्यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक परमार यांचा संगमनेरातील कार्यकाळ संपल्याने ते नगरच्या गुन्हे शाखेसाठी प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या शेवटच्या काही दिवसांतच शहर पोलीस ठाण्यात नाशिकच्या सराफाकडून तब्बल १ लाख रुपयांची लाच स्विकारतांना पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी पकडला गेला आणि शहर पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या रडारवर आले. पाटील यांनी निरीक्षक परमार यांना नियंत्रण कक्षात बोलावल्याने त्यांच्या गुन्हे शाखेच्या प्रयत्नावर पाणी फेरले गेले.

- Advertisement -

परमार यांच्या जागेवर राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निरीक्षक मुकूंद देशमुख यांची वर्णी लागली. तर परमार यांनी पुन्हा नव्याने प्रयत्न करत अकोले पोलीस ठाणे मिळविण्यात यश मिळविले. मात्र परमार यांची कार्यपध्दती माहीती असलेल्या अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष वाघ याने एका प्रकरणात दहा हजाराची लाच घेतली. त्यामुळे परमार यांच्या संगमनेर, अकोलेतील कार्यपध्दतीची चर्चा सुरु झाली होती. शहर पोलीस ठाण्यातील लाखभर रुपयांच्या लाचखोरीपाठोपाठ अकोल्यातही त्यांच्या कार्यकाळातच पंधरा दिवसातच लाचखोरीचे दुसरे प्रकरण समोर आल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले होते.
तर शहर पोलीस ठाण्यात आलेल्या निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी पोलीस कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी पावले उचलली होती. त्याचे परिणाम समोर येण्यापुर्वीच शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक बापुसाहेब देशमुख एका मिसींगच्या प्रकरणात एक हजारची लाच घेतांना पकडला गेला. त्यामुळे परमार यांच्या कार्यकाळात लाचखोरी करण्यासाठी सोकावलेले पोलीस राजरोसपणे लाच घेत असल्याचे समोर आले. विषेष म्हणजे हे सर्व छापे नाशिकच्या लाचलुचपत विभागाने टाकले होते. बदल्यानंतर सत्कारात हे दोन्ही अधिकारी मश्गुल असतानाच लाचलुचपतचे पडलेले छापे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरले आहे.

मंगळवारी नाशिक विभागाचे विषेश पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बैठकीसाठी संगमनेरात आले होते. त्यांच्याच आदेशावरुन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी हे आदेश काढल्याचे बोलले जाते. या निरीक्षकांबाबत पोलीस अधीक्षकांकडेदेखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. या दोन्ही निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या दोन्ही निरीक्षकांच्या जागी कोणाला संधी मिळते हे लवकरच समजेल.

- Advertisement -

अकोल्यात निरीक्षक परमारांसाठी मनसे सरसावली
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निरीक्षक परमार यांची बदली करुन काही तास उलटत नाही तोच त्यांना पुन्हा अकोले पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यासाठी गृहमंत्र्यांचे दरवाजे ठोठावले आहेत. परमार यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत अकोलेतील अवैध व्यवसायांना आळा घातला होता. त्यांनी अकोल्याची वेगळी आळख निर्माण केली. त्यामुळे त्यांना पुन्हा अकोले पोलीस ठाण्यात येत्या दोन दिवसांत नियुक्त न केल्यास अकोले बंद ठेऊन पोलीस स्टेशनसमोर उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष वकील डी. एम. गवांदे, तालुकाध्यक्ष दत्ता नवले, निवृत्ती भालेराव आदींनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

- Advertisement -