घरमतप्रवाहभाग ३० - आई, मी आणि साहेब!

भाग ३० – आई, मी आणि साहेब!

Subscribe

मित्रांनो, “साहेब माझा विठ्ठल” या सिरीजचा हा शेवटचा भाग.गेल्या एक महिन्यात आपण रोज एक,याप्रमाणे 30 भाग इथं पोस्ट केलेत.या सिरीजला आपल्या सर्वांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.याबद्दल तर मी आपला आभारी आहेच सोबतच माझ्या साहेबांचा दैदीप्यमान इतिहास हा मी माझ्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या आणि मित्रांच्या,सहकाऱ्यांच्या,नागरिकांच्या समोर मांडू शकलो याच समाधान देखील आहे.

हा शेवटचा जो भाग मी लिहितोय तो,माझ्या आयुष्याशी निगडीत आहे.माझ्या आयुष्यातील एका अतिशय कठीण प्रसंगी माझा हा विठ्ठल माझ्यासोबत आपल्या पूर्ण ताकदीने कसा भक्कमपणे मागे कसा उभा राहिला? हे सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

- Advertisement -

माझी आई शेवटची घटका मोजत होती.तिला कॅन्सर होता.आईला मृत्युशय्येवर पाहत असल्याने माझ्या डोळ्यात सतत अश्रू होते.ती कोणत्याही क्षणी आम्हाला सोडून जाणार होती.

राजस्थानमध्ये डुंगरपूर म्हणून एक गाव आहे.तिथं एक सुफी बाबा होते.सुफी बाबा असले तरी ते आयुर्वेदिक वनस्पती उपचार करण्यात निष्णात होते.त्याकाळी या बाबांचा खूप बोलबाला होता.मृत्यूशय्येवर असणाऱ्या माझ्या आईला वाचविण्याचा एक अंधुकशी आशा मला त्यांच्या रूपाने दिसत होती.माझ्या आईला देखील या बाबांना दाखवण्याची इच्छा होती.काहीही करून या सुफीबाबांना घरी आणयचेच या विचाराने मी कामाला लागलो. त्याकाळी ठाण्याच्या एका तत्कालीन प्रतिथयश नेत्याकडे देखील या बाबांचे येणंजाण होत.मी त्या बाबासंदर्भात त्यांना विचारणा केली.पण त्यांनी मला काही सहकार्य केलं नाही.

- Advertisement -

माझ्या परीने शक्य तितके प्रयत्न मी या बाबांशी संपर्क करण्यासाठी केले.त्याकाळी आजच्या एवढं दळणवळण सहज सोपं नव्हतं.माझे सगळे प्रयत्न करून संपले होते.पण काही केल्या त्या बाबांशी माझा संपर्क होऊ शकत नव्हता.माझे ही धडपड सुरू असताना मला एक धागा सापडला की त्या बाबांचे आणि काँग्रेसचे तत्कालीन मंत्री स्व.राजेशजी पायलट यांचे काहीतरी संबंध आहेत.

मी हा धागा पकडून पुन्हा कामाला लागलो.राजेशजी यांच्या सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला.परंतु आजच्या सारखी माझी पोहोच तेंव्हा नव्हती. मी निराश झालो होतो.आता एकच शेवटचा उपाय मला दिसत होता.तो म्हणजे पवार साहेब.

मी साहेबांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला.साहेब तेंव्हा दिल्लीत होते.साहेबांना मी दिल्लीला फोन लावला.साहेब फोनवर होते.साहेबांची एकूणच पुरोगामी विचारसरणी आणि विचारधारा अश्या बाबांच्या विरोधात आहे हे माहीत असून देखील मी साहेबांना न कचरता फोन लावला.
साहेबांना मी सगळा विषय सांगितला.स्व.राजेशजी पायलट यांच्या धाग्याबद्दल देखील सांगितले.तसेच हे बाबा सुफी असले तरी त्यांचा वनस्पती उपचारांचा अभ्यास असल्याचं देखील सांगितले.साहेब तिकडून धीरगंभीर स्वरात म्हणाले,”जितेंद्र काळजी करू नकोस.मी प्रयत्न करतो.पुढच्या 15 मिनिटात तुला राजेशजी यांचा फोन येईल..!”

मला थोडा धीर आला.डोळ्यात प्राण आणून मी टेलिफोनजवळ बसून राहिलो.राजेशजी त्यावेळी काँग्रेसची मोठी हस्ती होते.वजनदार नेते होते.त्यामुळे ते कॉल करतील की नाही याबद्दल मी साशंक होतो.पण माझा विठ्ठल साक्षात सांगतोय म्हटल्यावर मी सर्व काही त्यांच्यावर सोडून फोनशेजारी बसून राहिलो.

10 व्या मिनिटाला मला स्व.राजेशजी यांचा फोन आला.त्यांनी मला आधी धीर दिला.आणि माझ्याकडून सगळी परिस्थिती जाणून घेतली.
मी त्यांना त्या बाबांबद्दल सांगितलं.
त्यावर त्यांनी,” जितेंद्र मला या माणसाबद्दल जास्ती माहिती नाही.पण मी आपल्या स्थानिक खासदाराला याबद्दल विचारतो आणि तुला कळवतो..!”

माझं मन पुन्हा थोडं निराश झालं.मी फोनजवळच बसून होतो.काहीं वेळात मला एक फोन आला.तिकडून डुंगरपुरचे स्थानिक खासदार बोलत होते.त्यांनी देखील मला धीर दिला.आणि ते म्हणाले,
“मि त्या बाबाला घेऊन अहमदाबाद ला येतो.तुम्ही त्यांना तिकडून घेऊन जावा..!”

माझ्या मनावरील अवघा ताण अक्षरशः निघून गेला.लगोलग मी माझ्या राजू अय्यर या मित्राला अहमदाबाद ला पाठवले.दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या बाबाला अहमदाबाद एअरपोर्ट वरून मुंबईला आणलं.

मुंबई वरून ते आमच्या घरी आले.हात पाय धुवून ते बाबा माझ्या आईजवळ गेले.त्यांनीं आईच्या डोक्यावरून हात फिरवला परंतु दुर्दैवाने त्याच वेळी माझ्या आईने प्राण सोडला.माझ्यावर दुःखाचा पहाड कोसळला.आभाळ फाटन म्हणजे काय असत याची जाणीव मला तेंव्हा झाली होती.पण आईसाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केल्याचं एक आत्मिक समाधान देखील मनात होत.

आईचे सगळे सोपस्कार पार पाडले.नंतर 2 दिवसांनी मला साहेबांचा फोन आला.त्यांनी माझं सांत्वन केलं.आणि म्हणाले,”जितेंद्र आपण सामाजिक क्षेत्रात आहोत.कार्यकर्ते आहोत.जगातील सगळं दुःख पेलण्याची ताकद आपल्यात पाहिजे..!”

साहेबांच्या एवढ्या वाक्याने मी पुन्हा उभा राहिलो.पण हा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.

माझा हा विठ्ठल केवळ माझ्या आईची इच्छा होती म्हणूनच नव्हे तर आपल्या एका परिस्थितीमुळे हतबल झालेल्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी,त्याला धीर देण्यासाठी मोठ्या ताकदीने माझ्या मागे उभा राहिला.या माणसाला आपल्या कार्यकर्त्यांच दुःख जाणवत.त्याच्या मनातील घालमेल हा माणूस जाणू शकतो.आणि यावर तोडगा काढताना प्रसंगी हा माणूस आपली पूर्ण ताकद लावून आपल्या कार्यकर्त्याला धीर देण्यासाठी पाहिजे ते करू शकतो याची जाणीव मला तेंव्हा झाली. साहेब आणि स्व.राजेशजी पायलट यांच्यात त्यावेळी काय संभाषण झालं असेल याची मला आजही काही एक कल्पना नाही.पण आज लोक मला साहेबांच्यावर असणाऱ्या माझ्या निष्ठतेबद्दल विचारणा करतात.तेंव्हा हा आणि असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून तरळून जातात.

माझी आई गेली आणि माझ्यावर मायेची सावली या माणसाने धरली.माझ्या आईची कमी कधी जाणवू दिली नाही.प्रसंगी चिडले,रागावले असतील पण मला दूर कधी केलं नाही.आणि अश्या माणसाची साथ सोडण्याचे पातक म्हणूनच माझ्या हातून कधी झालं नाही आणि कधी होणार नाही..! लोक सतत देव शोधत असतात.मला माझा देव,माझा विठ्ठल माझ्या साहेबात दिसतो..!

माझ्या या विठ्ठलाला कायमच निरामय निरोगी आयुष्य लाभो ही प्रार्थना आहे..!

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -