जर लोकांनी एकत्र येऊन ठरवलं तर होय अमेरिकेसारखा बदल घडू शकतो!

us president election

संबंध जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल अजून अंतिम यायला काही काळ जाणार आहे. परंतु एकूण आतापर्यंतचे जे चित्र आहे त्याच्यामध्ये ट्रम्प पराभूत होऊन बायडेन हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील. अनेक दृष्टीने अमेरिकेची ही निवडणूक जगाच्यादृष्टीने म्हणजेच जगामध्ये लोकशाही असलेल्या देशांमध्ये यापासून काय नक्की धडा घ्यावा यासाठी अतिशय महत्त्वाची होती.

एक प्रकारची मक्तेदारी किंवा आपल्या म्हणण्यानुसारच सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत असं म्हणणार्‍या एकाधिकारशाही पध्दतीचं अर्थात अमेरिकेच्या घटनेमध्ये राष्ट्राध्यक्षांना तसे भरपूर अधिकार दिलेले आहेत. परंतु त्याचा अवास्तव वापर केल्यानंतर जे चित्र उभं रहातं ते फार भयानक होतं आणि कदाचित अमेरिकेतील जाणकार, सुजाण, वर्णविरहीत असा समाज जेव्हा एकवटतो तेव्हा त्याची ताकदसुध्दा काही बदल घडवू शकते अशा प्रकारचा हा निकाल असणार आहे. त्यामुळे बायडेन यांची जवळ जवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड होणार हे आता नक्की झालं आहे.

भारत – अमेरीका संबंध अनेक राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दीत आपण बघितलेले आहे. बर्‍याच वेळा डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष असला तर संबंध कसे होते आणि रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष होता तर कसे होते. या सगळ्या तुलनात्मक गोष्टी झाल्या. पण आता अमेरिकेचे अध्यक्ष जे बाहेर जात आहेत त्यांची व भारतातील नेत्यांची पहिली एक मैत्री होती. या मैत्रीचं प्रदर्शन अमेरिकेत आणि भारतात मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि या मैत्रीमागील गूढ काय असा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडत होता. परंतु त्याही काळात एकीकडे मैत्री करत असताना जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे ट्रम्पनी वेळोवेळी काश्मीरचा मुद्दा असेल सोयीस्करपणे कधी पाकिस्तानची बाजू घेऊन मध्यस्थी करायला तयार तर कधी चीनबरोबर आगळीक झाली तरी मध्यस्थी करायला तयार… म्हणजे ही ढवळाढवळ करण्याची त्यांची इच्छा मैत्री असूनसुध्दा लपून राहिलेली नव्हती, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

आता अनेक आंतरराष्ट्रीय सहकार्याबद्दलच्या गोष्टी असतात. त्यांच्यामध्ये पॅरीस क्लायमेंटच्या संदर्भात डिक्लेरेशन आहे. याच्यातून अमेरिकेला सध्याच्या अध्यक्षांनी बाजूला काढलेलं होतं. एका आंतरराष्ट्रीय स्तरावर पृथ्वीच्या पर्यावरणाचा विचार करणारी संस्था आहे. तिच्यापासून बाहेर पडणं हे किती नकारात्मक गोष्ट असू शकते हे सगळ्या जगाला कळत होतं. पण सुदैवाने भारत त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष येतील त्यांचं जाणाऱ्या अध्यक्षांप्रमाणे भारत स्वागत करणार की नाही हा प्रश्न आहे.

मोठमोठे व्यापार, व्यवहार, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण, संरक्षणाच्याबाबतीत या सगळ्या गोष्टी सर्व देशांमध्ये असतातच. पण त्याहीपलीकडे जाऊन लोकशाही जपणं, व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देणं आणि कुठल्याही प्रकारचा धर्मामध्ये, जातीमध्ये, वर्णामध्ये भेद होऊ न देता एकत्रित राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तो संदेश अमेरिकेच्या निवडणुकीने दिलेला आहे असं आपण अजिबात समजू नये. अशा प्रकारच्या वृत्तीने वागणारा जो एकाधिकारशाही वापरणारा असतो त्याचे समर्थक मोठ्या प्रमाणात असतात तेही या निवडणुकीत दिसून आले. आपल्या सारख्यांना वाटलंही नव्हतं की, अमेरिकेसारख्या देशात निवडणुकीनंतर मोर्चे निघतील… एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील. पण आज ते वास्तव आहे त्या वास्तवाचा भारताशी थेट संबंध नसला तरी वेगवेगळ्या राज्यांमधील निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक होऊ घातली आहे. आज बिहारची निवडणूक संपणार आहे. लोक काय करतात याच्यापेक्षा भीतीचं सावट दूर करून सुरक्षित नागरिकत्व आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना यापुढे संघटीतपणे गेलं तर आणि तरच आपण लोकशाही मार्गाने देश पुढे नेऊ शकतो, अशा प्रकारची एक चांगली घटना यानिमित्ताने घडू शकते. त्यामुळे बायडेन यांचा विजय किंवा ट्रम्प यांचा पराजय याचा अन्वयार्थ लावताना आपण हे समजून घेतलं पाहिजे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे होणारे परिणाम आणि भारत – अमेरीका संबंध यावर होणारे परिणाम यामध्ये सजगतेने पाऊले टाकून आपण या सगळ्याचा स्वीकार करायला हवा.

निवडणुका आहेत… राजकीय पक्ष एकदा येतात… सत्तेत असतात कधी विरोधी असतात हे सगळं गृहीत धरलं तरी प्रवृत्ती कुठल्या आहेत. कुठल्या प्रवृत्ती लोकांना नको आहेत या पद्धतीचा अभ्यास पुढच्या काळात आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे.

आता दोन दिवसांनी अध्यक्ष जाहीर होतील. कारण नव्याने होणारे अध्यक्ष कारभार जानेवारीमध्ये हाती घेऊ शकतात. त्यांच्या राज्यघटनेप्रमाणे तोपर्यंत ते निर्वाचित अध्यक्ष म्हणून असतील. त्यांना जी सुरक्षा पुरवण्याची आवश्यकता आहे ती पुरवली गेलेली आहे. या मधल्या निवडणूक मतमोजणीच्या काळात ज्या प्रकारे त्यांची सगळी स्टेटमेंट येत होती. त्यापुढे काही वाहिन्यांनी तर त्यांचे प्रक्षेपण अर्धवट बंद केले होते. त्यांनी ज्याप्रकारे सगळ्या नोकरशाहीच्या विरोधात आणि महामारीच्या संकटामध्ये ज्या एका अलिप्त वृत्तीने त्यांनी पाहिलं. हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना जे सावरायला पाहिजे होतं ते सावरण्याचा कुठेही विचार नव्हता आणि कदाचित हीच गोष्ट या निवडणुकीच्या निकालामध्ये प्रकर्षाने आपल्याला पुढे आलेली जाणवेल. भारताला अमेरिकेच्या निवडणुकीपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. खूप काही बदल करण्यासारखे आहे आणि जर लोकांनी एकत्र येऊन ठरवलं तर होय बदल घडू शकतो!


लेखक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी विधानपरिषद सदस्य आणि प्रवक्ते आहेत.