Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर पालघर मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणारे तुळींजचे पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर?

मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणारे तुळींजचे पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर?

Related Story

- Advertisement -

वसईत एका कार्यक्रमात दोन मनसे कार्यकर्त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करणारे तुळींज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार काही दिवस रजेवर गेले असल्याची माहिती मिळात आहे. मनसेकडून कांबळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याला दुजोरा मिळालेला नाही. गेल्या मंगळवारी वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेचा शुभारंभ कार्यक्रम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात महापालिका आयुक्त डी. गंगाथरन यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत राडा घातला होता. तेव्हा त्या ठिकाणी हजर असलेले तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दोन्ही मनसैनिकांना मारहाण करीत अर्वाच्य शिवीगाळ केली होती. त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी तुळींज पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन आपला संताप व्यक्त केला होता.

ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, सचिन मोरे, सचिन गोळे, अविनाश जाधव यांनी कांबळे यांचे निलंबन करावे, अशी मागणी केली होती. अन्यथा मंगळवारी राज्यातील मनसेच्या महिला कार्यकर्त्या नालासोपाऱ्यात येऊन ठिय्या आंदोलन करतील असा इशारा दिला होता.

- Advertisement -

दरम्यान, सोमवारी राजेंद्र कांबळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर चौकशी सुरु आहे. पण, पोलीस निरीक्षकांवर सक्तीच्या रजेवर जाण्याची कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांनी दिली. मात्र, मनसे आक्रमक झाल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कांबळे यांनी काही दिवस स्वतःहून रजेवर जाण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -