पुढील वर्षीच्या फिफा १७ वर्षांखालील महिला वर्ल्डकपबाबत आशादायी!

करोनामुळे १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला धोका असला तरी क्रीडा मंत्री किरण रिजिजू विश्वचषक होण्याबाबत आशादायी आहेत.

New Delhi

करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून जगभरातील सर्व खेळ बंद होते. परंतु, आता काही देशांतील खेळांना प्रेक्षकांविना सुरुवात झाली आहे. परंतु, भारतात अजूनही करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने कोणतेही खेळ सुरु झालेले नसून खेळाडूंना एकत्रित सरावासाठीही परवानगी मिळालेली नाही. करोनामुळेच यंदा भारतात होणारा १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक पुढील वर्षीपर्यंत लांबणीवर पडला आहे. यंदा हा विश्वचषक २ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार होता. मात्र, आता हा विश्वचषक पुढील वर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत होईल. करोनानंतर भारतात आयोजित होणारी ही बहुधा सर्वात मोठी स्पर्धा असू शकेल. करोनामुळे या स्पर्धेला धोका असला तरी क्रीडा मंत्री किरण रिजिजू विश्वचषक होण्याबाबत आशादायी आहेत.

सध्याची परिस्थिती अवघड

या विश्वचषकाचे सामने कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, अहमदाबाद आणि नवी मुंबई या ठिकाणी होणार आहेत. या पाचपैकी गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विश्वचषकाला अजून सात महिने शिल्लक असल्याने क्रीडा मंत्रालय, स्थानिक आयोजन समिती आणि राज्य सरकारांना तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा आहे. ‘सध्याची परिस्थिती अवघड आहे आणि पुढे काय होणार हे आताच सांगणे अवघड आहे. मात्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा सरकार विचार करत असून महिलांची १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडावी आणि सहभागी संघांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’, असे रिजिजू यांनी एका मुलाखतीत सांगितले.

भारतासाठी ही स्पर्धा महत्त्वाची

भारताने २०१७ मध्ये १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले होते. आता महिलांच्या विश्वचषकाचे आयोजनही भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असल्याचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले. १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकासारखी स्पर्धा भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. या स्पर्धेमुळे आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. तसेच आपला आर्थिकदृष्ट्याही खूप फायदा होईल. त्यामुळे पुढील वर्षी ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा होईल अशी आम्हाला आशा आहे, असे रिजिजू म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here