घरक्रीडाकसोटी क्रमवारी : स्मिथला बढती; कोहलीच अव्वल

कसोटी क्रमवारी : स्मिथला बढती; कोहलीच अव्वल

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथने सध्या सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत अफलातून कामगिरी केली आहे. त्याने जवळपास दीड वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतके (१४४ आणि १४२) झळकावली, तर लॉर्ड्सवर झालेल्या दुसर्‍या कसोटीत त्याने ९२ धावांची खेळी केली. या त्याच्या कामगिरीमुळे त्याला आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत एका स्थानाची बढती मिळाली आहे. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. विल्यमसनने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन डावांत मिळून केवळ ४ धावा केल्या. त्यामुळे त्याची एका स्थानाची घसरण झाली आहे.

कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र, त्याच्यात आणि दुसर्‍या स्थानी असणार्‍या स्मिथमध्ये फक्त ९ गुणांचा फरक आहे. कोहलीच्या खात्यात ९२२ गुण असून स्मिथचे ९१३ गुण आहेत. तिसर्‍या स्थानी घसरण झालेल्या विल्यमसनचे ८८७ गुण आहेत. त्यामुळे स्मिथने पुढील सामन्यात दमदार कामगिरी केल्यास तो पहिल्या स्थानी झेप घेऊ शकेल. या क्रमवारीत भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने चौथे स्थान कायम राखले आहे. तो आणि कोहली हे दोनच फलंदाज अव्वल दहामध्ये आहेत. अ‍ॅशेसच्या दोन सामन्यांत खराब कामगिरी करणार्‍या इंग्लंडच्या जो रूटची नवव्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतकी खेळी करणार्‍या दिमुथ करुणरत्नेने आठव्या स्थानी झेप घेतली आहे.

- Advertisement -

गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानावर आहे. त्याने अ‍ॅशेसच्या दोन सामन्यांत १३ विकेट्स मिळवल्या आहेत. त्याच्या खात्यात ९१४ गुण आहेत. ९०० हून अधिक गुण असणारा तो एकमेव गोलंदाज आहे. भारताचा डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजा सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन दहाव्या स्थानावर आहे.

भारताची घसरण होण्याची शक्यता
आयसीसीच्या जागतिक कसोटी संघाच्या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे. मात्र, विंडीजविरुद्धची २ सामन्यांची मालिका ०-१ अशीही गमावल्यास ते दुसर्‍या स्थानावर घसरू शकतील. भारताचे ११३ गुण असून दुसर्‍या स्थानी असणार्‍या न्यूझीलंडचे १११ गुण आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -