घरक्रीडावर्ल्डकपमधील दबाव वेगळाच!

वर्ल्डकपमधील दबाव वेगळाच!

Subscribe

क्रिकेट विश्वचषकात गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये सामना होणार आहे. भारताने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून, ५ पैकी ४ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे हा संघ उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर आहे. याउलट वेस्ट इंडिजची या स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक आहे. त्यांना ६ पैकी केवळ १ सामनाच जिंकता आला आहे. आता त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असल्यास जवळपास सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत. विंडीज संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. त्यांच्या निराशाजनक कामगिरीला विश्वचषकातील दबाव कारणीभूत असू शकतो, असे भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलला वाटते.

तुमच्या देशासाठी विश्वचषकात खेळणे आणि आयपीएलमध्ये खेळणे, या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. विश्वचषकात खेळण्याचा दबाव वेगळाच असतो. या स्पर्धेत सर्व संघांवर सामने जिंकण्याचे प्रचंड दडपण आहे. मात्र, विंडीजला यापुढील सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. तसेच त्यांचे खेळाडू फॉर्मात येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारत-विंडीज सामन्यातील परिस्थिती आणि वातावरण फार वेगळे असेल, असे चहल म्हणाला.

- Advertisement -

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला अवघ्या २२४ धावा करता आल्या. मात्र, गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने हा सामना जिंकला. याप्रकारच्या सामन्याची भारताला गरज होती असे चहलला वाटते. तसेच कमी धावसंख्या असताना आमचे लक्ष्य जास्तीतजास्त निर्धाव चेंडू टाकण्याचे असते, असे चहल म्हणाला. गोलंदाजीत सुरुवातीपासून फलंदाजांवर दबाव बनवून ठेवणे आणि जास्तीतजास्त निर्धाव चेंडू टाकणे, हे आमचे लक्ष्य होते. जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला अखेरच्या प्रत्येक षटकात ६ पेक्षा जास्त धावांची गरज असेल. दुसर्‍यांदा गोलंदाजी करताना कधीकधी ३५० धावाही कमी पडतात, तर कधी २५० पेक्षा कमी धावाही पुरेशा होतात, असे चहल म्हणाला.

रसेलसाठी विशेष योजना

- Advertisement -

विंडीजचा तडाखेबाज अष्टपैलू आंद्रे रसेलने विश्वचषकाआधी झालेल्या आयपीएलमध्ये अफलातून प्रदर्शन केले होते. मात्र, विश्वचषकात त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यातच दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मागील सामन्यात तो खेळू शकला नव्हता, पण तो भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी काय योजना आहे, असे विचारले असता युजवेंद्र चहलने सांगितले, आम्ही नक्कीच योजनेनुसार गोलंदाजी करू. रसेल हा आक्रमक फलंदाज आहे, पण आम्ही याआधी त्याच्याविरुद्ध बर्‍याचदा गोलंदाजी केली आहे. रसेल जर चौथ्या क्रमांकानंतर फलंदाजीला आला, तर त्याला सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळावे लागणार आहे. त्यामुळे तो ज्याप्रकारे खेळेल, त्यानुसार आम्हाला आमच्या योजना बदलाव्या लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -