घरक्रीडाटीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यास सक्षम!

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यास सक्षम!

Subscribe

प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मत

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरु होणारा क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रमुख दावेदार मानले जात आहे. भारतीय संघाने मागील काही वर्षांत खूप चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे हा संघ आयसीसी क्रमवारीत दुसर्‍या स्थानी आहे. या संघात युवा आणि अनुभवी या दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. त्यामुळे हा संघ विश्वचषक जिंकण्यास सक्षम आहे, असे मत भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. तसेच या संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याबाबतही बरीच चर्चा झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के प्रसाद यांनी संघाची घोषणा विजय शंकर या क्रमांकावर खेळेल असे म्हटले होते. मात्र, या क्रमांकावर कोण खेळणार हे आम्ही परिस्थितीनुसार ठरवू असे शास्त्री म्हणाले.

आमच्या संघात कोणताही खेळाडू कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो. आमचा संघ हा विश्वचषक जिंकण्यासाठी सक्षम आहे. या संघात असे बरेच खेळाडू आहेत, जे चौथ्या क्रमांकावर खेळू शकतील. त्यामुळे या क्रमांकावर कोण खेळणार याची मला अजिबातच चिंता नाही. माझ्या मते आमचा संघ संतुलित आहे. विश्वचषकासारख्या स्पर्धेसाठी तुम्हाला असे खेळाडू नको असतात, जे फक्त जागा भरण्यासाठी संघात आहेत. तुम्हाला असे १५ खेळाडू हवे असतात, जे कधीही संघात येऊन चांगले प्रदर्शन करू शकतील. जर एखाद्या वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली, तर बदली खेळाडू आमच्याकडे लगेच उपलब्ध असेल, असे शास्त्री म्हणाले.

- Advertisement -

नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये केदार जाधवला दुखापत झाली होती, तर चायनामन कुलदीप यादवला या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करता आले नाही. याबाबत तुम्हाला काय वाटते असे विचारले असता शास्त्री म्हणाले, मला याची चिंता नाही. खरे सांगायचे तर मी याबाबत जराही विचार केलेला नाही. २२ मे रोजी जेव्हा आम्ही विमानात बसू, तेव्हा आम्हाला नक्की कल्पना येईल की या संघात १५ खेळाडू कोण असणार आहेत. त्यानंतर आम्ही योजना आखू. केदारबाबत सांगायचे झाले तर त्याच्या बोटाला फ्रॅक्चर नाही, ही चांगली बाब आहे. त्यामुळे त्याच्याबाबतचा निर्णय आम्ही काही वेळाने घेऊ. मात्र, तो या स्पर्धेसाठी फिट होईल, अशी मला आशा आहे.

तसेच विश्वचषकासारख्या स्पर्धेसाठी तुम्ही फार आधीपासून योजना आखून काही उपयोग नसतो, असे शास्त्रींना वाटते. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही सामन्यानुसार आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणे आवश्यक असते. तुम्ही फार आधीपासून योजना आखून काही उपयोग नाही. दोन विश्वचषकांमध्ये जो ४ वर्षांचा कालावधी मिळतो, त्यात तुम्ही चांगली तयारी केली पाहिजे, असे शास्त्रींनी सांगितले.

- Advertisement -

विंडीज, ऑस्ट्रेलियाही दावेदार

इंग्लंडमध्ये होणार हा विश्वचषक जिंकण्याचे भारत आणि इंग्लंड या संघांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांवरही नजर ठेवावी लागेल, असे रवी शास्त्रींना वाटते. वेस्ट इंडिज संघ जेव्हा भारतात आला होता, तेव्हा मी म्हणालो होतो की आम्ही मालिका जिंकलो असलो, तरी ते खूप चांगले खेळले. त्यावेळी या संघात गेल आणि रसेलसारखे खेळाडूही नव्हते. या संघावर नजर ठेवावी लागेल, कारण या संघात बरेच प्रतिभावान खेळाडू आहेत. तसेच गतविजेता ऑस्ट्रेलियाही ही स्पर्धा जिंकण्याचा दावेदार आहे. मागील २५ वर्षांत त्यांच्याइतके विश्वचषक कोणीही जिंकलेले नाहीत. ऑस्ट्रेलियन संघाने तगडी टक्कर दिली नाही, असे कधीही झालेले नाही, असे शास्त्री म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -