इतक्या सामन्यांनंतर का होईना, विजयाचा श्रीगणेशा झाल्याचा आनंद

Mumbai
virat kohli
विराट कोहली

किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या आयपीएल मोसमातील आपला पहिला विजय मिळवला. बंगळुरूला हा विजय मिळवण्यासाठी ७ सामने लागले. कर्णधार विराट कोहली (६७) आणि एबी डीव्हिलिअर्स (नाबाद ५९) यांनी अप्रतिम फलंदाजी केल्यामुळे पंजाबने दिलेले १७४ धावांचे लक्ष्य बंगळुरूने ४ चेंडू राखूनच पूर्ण केले. या विजयानंतर कर्णधार कोहली खूप खुश होता.

हा सामना जिंकल्याचा मला खूप आनंद आहे. मी असे म्हणत नाही की आम्ही प्रत्येक सामन्यात विजयाच्या जवळ होतो. परंतु, काही सामन्यांत आम्हाला नक्कीच विजयाची संधी होती आणि योग्यवेळी आम्हाला खेळ उंचावता आला नाही. इतके सामना गमावल्यानंतरही आमच्या खेळाडूंमध्ये सामना जिंकण्याची तीव्र इच्छा होती. याच विषयी आम्ही चर्चा करत होतो. या खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघ १९० पर्यंत धावा करेल असे आम्हाला वाटत होते, पण त्यांना १७० धावांवर रोखणे हे खूपच कौतुकास्पद होते, असे सामन्यानंतर कोहली म्हणाला.

तसेच सामनावीराचा पुरस्काराचा मिळवणारा डीव्हिलिअर्स म्हणाला, आम्हाला या विजयासाठी खूप वाट पाहावी लागली, पण हा सामना जिंकल्याचा आनंद आहे. आम्ही योग्य दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

कर्णधार कोहलीला दंड

पंजाबविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे (स्लो-ओव्हर रेट) बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोहलीवर यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनाही याच करणासाठी दंड ठोठवण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here