IND vs AUS : अजिंक्य रहाणेने विराट कोहलीची नक्कल करू नये – हरभजन

कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणे भारताचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. 

virat kohli and ajinkya rahane
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर जाणार पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अजिंक्य रहाणे उर्वरित तीन कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. कोहली आणि रहाणे यांच्या व्यक्तिमत्वात, तसेच खेळात भिन्नता आहे. कोहली हा आक्रमक, तर रहाणे संयमी आहे. त्यामुळे भारताचे नेतृत्व करताना रहाणेने कोहलीची नक्कम न करता, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला धरूनच निर्णय घेतले पाहिजेत, असे हरभजन सिंगला वाटते.

रहाणे खूप शांत आणि संयमी आहे. तो त्याच्या भावना व्यक्त करत नाही. त्याच्यात आणि विराट कोहलीमध्ये खूप भिन्नता आहे. कोहली नसताना रहाणे भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. रहाणेने भारताचे नेतृत्व करताना त्याच्या व्यक्तिमत्वात किंवा त्याच्या खेळात बदल करू नये, असा माझा त्याला सल्ला असेल. विराट खूप आक्रमक आहे आणि ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी आपल्याला विराटसारखे वागावे लागेल असे रहाणेला वाटू शकेल. मात्र, याची अजिबातच गरज नाही. रहाणेने त्याच्या व्यक्तिमत्वानुसार आणि त्याला योग्य वाटतील असेच निर्णय घेतले पाहिजेत. तेच भारतीय संघाच्या फायद्याचे असेल, असे हरभजनने सांगितले.

कोहलीच्या नेतृत्वात भारताने २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे भारतीय संघाला फलंदाज, तसेच कर्णधार म्हणूनही कोहलीची उणीव भासेल, असेही हरभजनला वाटते. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला एकदिवसीय मालिकेपासून सुरुवात होणार असून पहिला सामना २७ नोव्हेंबरला होईल.