घरक्रीडाभारतीयांना कठीण ड्रॉ

भारतीयांना कठीण ड्रॉ

Subscribe

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन

भारताचे आघाडीच्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांना ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सुरुवातीपासूनच कठीण प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जावे लागणार आहे. यंदाची स्पर्धा ६ मार्चला सुरु होणार आहे. मागील १८ वर्षांत या मानाच्या स्पर्धेचे भारतीय बॅडमिंटनपटूला जेतेपद मिळवता आलेले नाही.

ऑलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक मिळवणार्‍या पी.व्ही.सिंधूला यंदाच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या पहिल्या सामन्यात द.कोरियाच्या सुंग जी ह्युनला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षी ह्युनने हाँगकाँग ओपनमध्ये सिंधूचा पराभव केला होता. जर सिंधूला ह्युनला पराभव करण्यात यश आले तर दुसर्‍या फेरीत तिचा तिसर्‍या सीडेड चेन युफेईशी सामना होईल.

- Advertisement -

मागील महिन्यात इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकणार्‍या सायना नेहवालसमोर स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिल्मोरचे आव्हान असणार आहे. जर सायनाला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले तर या फेरीत तिचा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताई झू यिंगशी सामना होण्याची शक्यता आहे. सायनाने यिंगविरुद्धचे मागील सलग ११ सामने गमावले आहेत.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये किदाम्बी श्रीकांतसमोर फ्रान्सच्या ब्राईस लेव्हरडेझचे, तर समीर वर्मासमोर व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनचे आव्हान असणार आहे. साई प्रणित आणि एच. एस. प्रणॉयला एकमेकांचा सामना करावा लागणार आहे.
२००१ मध्ये सध्याचे राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी खेळाडू म्हणून ही मानाची स्पर्धा जिंकली होती, मात्र त्यानंतर एकाही भारतीयाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -