घरक्रीडादिमित्रोव्हचा फेडररला धक्का

दिमित्रोव्हचा फेडररला धक्का

Subscribe

अमेरिकन ओपन

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू आणि २० वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या रॉजर फेडररला अमेरिकन ओपनमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने पराभवाचा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत ७८ व्या स्थानी असणार्‍या दिमित्रोव्हने उपांत्यपूर्व फेरीतील फेडररविरुद्धचा सामना ३-६, ६-४, ३-६, ६-४, ६-२ असा पाच सेटमध्ये जिंकला. या विजयामुळे दिमित्रोव्ह अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा मागील २८ वर्षातील सर्वात खालच्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याचा या फेरीत डॅनिल मेडवेडेव्हशी सामना होईल.

मला हा सामना जिंकल्याचा आनंद आहे. ’हा सामना लवकर गमावू नकोस’ असे मी स्वतःला सांगत होतो. मी फेडररविरुद्ध जे फटके मारत होतो, ते इतर वेळी मारणे खूप अवघड आहे, असे दिमित्रोव्ह सामन्यानंतर म्हणाला. अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची दिमित्रोव्हची ही पहिलीच वेळ आहे. याआधी त्याने २०१४ मध्ये विम्बल्डन आणि २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धांची उपांत्य फेरी गाठली होती.

- Advertisement -

या सामन्याची फेडररने चांगली सुरुवात केली होती. त्याने पहिला आणि तिसरा सेट जिंकत २-१ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, दिमित्रोव्हने दमदार पुनरागमन करत चौथ्या सेटमध्ये फेडररची सर्व्हिस मोडली आणि हा सेट ६-४ असा जिंकला. त्यामुळे सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. पाचव्या आणि निर्णयक सेटमध्ये दिमित्रोव्हने सुरुवातीपासूनच अप्रतिम खेळ केला. त्याने दोन वेळा फेडररची सर्व्हिस मोडली, तर आपली सर्व्हिस राखली. त्यामुळे त्याला ४-० अशी आघाडी मिळाली. यानंतर फेडरर पुनरागमन करू शकला नाही. दिमित्रोव्हने हा सेट ६-२ असा मोठ्या फरकाने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सामना जिंकता न आल्याचे दुःख!
अमेरिकन ओपनमध्ये ग्रिगोर दिमित्रोव्हविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यादरम्यान रॉजर फेडररच्या मानेजवळचा भाग दुखू लागला. त्यामुळे त्याने टाईम-आऊटही घेतला. या दुखापतीविषयी आणि सामना गमावल्याविषयी फेडरर म्हणाला, मला दुखापत काही काळापूर्वीच झाली आहे. मात्र, मी तरीही खेळत राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, माझा पराभव या दुखापतीमुळे झाला असे मी म्हणणार नाही. ग्रिगोरने चांगला खेळ केला आणि तो जिंकला. मी त्याला झुंज दिली. मी या स्पर्धेमध्ये उत्तम खेळत होतो. त्यामुळे मी हा सामना जिंकू शकलो नाही आणि आगेकूच करू शकलो नाही याचे दुःख आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -