घरIPL 2020काय सांगताय..? खरंच..?

काय सांगताय..? खरंच..?

Subscribe

मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांनी अनुक्रमे इशान किशन आणि मयांक अग्रवाल या फॉर्मातील फलंदाजांना थकल्याचे कारण देत पाठवलेच नाही. मुख्य म्हणजे एक विकेट पडल्यानंतरही त्यांचा विचार न होणे ही बाब निश्चितच अनेकांना खटकली. कारण यादरम्यान 15 मिनिटांहून अधिक वेळ निघून गेली होती, जी रिकव्हरीसाठी पुरेसी होती. कदाचित त्यांचा फॉर्म आणि दिवस असल्याने एखाद-दोन चेंडूही ते खेळले असते तरी सामन्याचा निकाल वेगळा असता. परंतु, आजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा आणि मिळणार्‍या सुविधा पाहता दोन्ही टीम मॅनेजमेंटच्या निर्णयांनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

यंदाच्या आयपीएल सत्रात चार सामने अत्यंत चुरशीचे ठरले. यात शनिवारी रात्रीचा केकेआर आणि दिल्लीचा सामना हाय स्कोअरिंग ठरला. पंजाब आणि राजस्थानमधील सामन्यातही चांगलीच काट्याची टक्कर झाली. मात्र, याव्यतिरिक्तच्या दोन्ही सामन्यांत सुपर ओव्हर खेळवावी लागली आणि प्रेक्षकांसह सर्वांनाच डोकं खाजवावं लागलं. याला कारणही तसंच होतं. दोन्ही सामन्यांत ज्या फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे किमान बरोबरी शक्य झाली, त्या फलंदाजांना सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला पाठवलेच गेले नाही. विशेष म्हणजे, एक गडी बाद झाल्यानंतरही त्यांचा विचार झाला नाही, ही बाब अनेकांना खटकली. यामुळे अनेकांना ‘फिक्सिंग’चा गंध आला. बरीच मतमतांतरेही व्यक्त झाली. मूळात, दोन्ही संघांच्या कर्णधार आणि प्रशिक्षकांकडून हे फलंदाज थकल्याचे कारण दिले गेले असले तरी आजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा आणि मिळणार्‍या सुविधा पाहता मॅनेजमेंटच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. त्याविषयी…

आयपीएल ही जगातील सर्वाधिक पसंतीच्या स्पर्धांपैकी एक. याच मुळे तिला कवेत घेण्यासाठी सट्टाबाजांसह अंडरवर्ल्ड डॉनही उतावळे होत असतात. प्रत्येक आयपीएल सीझनमध्ये फिक्सिंगचा गंध येतोच. यापासून आपली प्रतिमा सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न क्रिकेट बोर्डकडून जरी केला जात असला तरी त्यापासून ते वाचू शकले नव्हते. 2013 मधील फिक्सिंग प्रकरणामुळे जगभरात या आणि अशा अनेक लीगकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला होता. यामुळेच अशा स्पर्धांना ‘पैशांचा खेळ’ म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यापूर्वीही 2000 साली भारत-दक्षिण आफ्रिका दौर्‍यात सट्टा लावणार्‍या आंतरराष्ट्रीय बुकी संजीव चावलाने क्रिकेटची लख्तरे काढली होती. चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणेच क्रिकेट सामन्यांचेही ‘ठरलेले’ असते, असा गौप्यस्पोट करत त्यांनी अनेक धक्कादायक विधानेही केली होती. ज्यामुळे बीसीसीआयला विशेष प्रतिबंधात्मक समित्या नेमण्याची गरज भासली. 2013 मध्ये त्यावर शिक्कामोर्तबही झालं. अर्थात सर्वच सामने आणि स्पर्धा किंवा खेळाडू याचा हिस्सा नसले तरी बदनामी मात्र खेळाची झालीच.
यंदाच्या मोसमात कोरोनाच्या सावटाखाली होणार्‍या या स्पर्धेत खेळाडूंसह सर्वांनाच विलगीकरणात (बायो-सिक्यूर एन्व्हार्यन्मेंट) रहावे लागतेय. यामुळे प्रत्येकाची सुरक्षा तर जोपासली जातेय, परंतु त्यांच्यावर नजर ठेवणे तितकेच जिकिरीचेही ठरते आहे. बीसीसीआयच्या विशेष पथकानेही याची स्पष्टोक्ती दिली आहे. शिवाय धोक्याची घंटाही वाजवली आहे. यात अद्याप कुणाचे नाव नसले तरी तरुण आणि नवखे खेळाडू बुकींच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता दाट असल्याचे बोलले गेले आहे. या घटनांमुळे आणि आजपर्यंत झालेल्या काही सामन्यांमधील आक्षेपार्ह निर्णयांमुळे शंकेची पाल चुकचुकल्यावाचून राहात नाही. यंदाच्या दोन्ही सुपर ओव्हरच्या सामन्यांमध्ये यावरून बराच वादंगही उठला, जो दुर्लक्षित करून कदापीही चालणार नाही.

- Advertisement -
IPL :Mayank agrawal
IPL :Mayank agrawal

‘फिटनेस लेव्हल हाय’, पण मॅनेजमेंटचं काय?

आजघडीला क्रिकेटचा दर्जा इतका उंचावला आहे की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात ‘हाय लेव्हल परफॉर्मन्स’ बघायला मिळतोय. यासाठी केवळ प्रशिक्षकच नव्हे, तर फिटनेस ट्रेनर, फिजिओथेरपिस्ट यांच्यासह अनेक सहकारी नेमले जातात. जे खेळाडूंकडून वातावरणाच्या अभ्यासानुसार वर्क आऊट करून घेतात. विशेष करून दमट, उष्ण वातावरणात खेळण्यापूर्वी अधिक खबरदारी घेतली जाते. आज यूएईमधील वातावरण पाहिले तर थकवा अधिक येतो हे आपण पाहतोय. परंतु, आयपीएल खेळणार्‍या खेळाडूंची फिटनेस लेव्हल पाहिली तर ती त्याहीपेक्षा अधिक सरस ठरते. आयपीएलमधल्या खेळाडूंसाठीच्या सुविधा पाहिल्या तर डोळे विस्फारतात. नुसत्या सुविधाच नव्हे तर हेल्थी डाएट, न्यूट्रिशन, ब्रिदिंग एक्सरसाईज, हेवी वर्कआऊट याशिवाय मसाज, स्टिम बाथ, वेगवेगळ्या थेरपी या सर्व गोष्टींमुळे अशा वातावरणात वीस षटके खेळणे अशक्यप्राय तर नक्कीच नाही. डावाची सुरुवात करणार्‍या खेळाडूंनी अखेरपर्यंत किल्ला लढवल्यानंतर ते थकणे स्वाभाविक आहे. मात्र, सुपर ओव्हर झाल्यास मध्यांतरात दहा ते बारा मिनिटे मिळतात, त्यात एनर्जी ड्रिंक्ससह मसाजर आणि अनेक सुविधाही मिळतात. शिवाय अशा परिस्थितीचा विचार करूनच खेळाडूंना महिनाभर आधी त्या देशात जाऊन वातावरणाशी जुळवून घ्यायचे असते. त्यात श्वसनाच्या व्यायाम प्रकारांवर भर दिला जातो. थकल्यावर कमी वेळेत पुन्हा रिकव्हर होऊन खेळण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये असते. त्यात केवळ सहाच चेंडू खेळायचे आणि पळून धावा काढणे जास्त गरजेचेही नसते. (अर्थात मॅच जिंकायची असेल तर!) मात्र, मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांनी अनुक्रमे इशान किशन आणि मयांक अग्रवाल या फॉर्मातील फलंदाजांना थकल्याचे कारण देत पाठवलेच नाही. मुख्य म्हणजे एक विकेट पडल्यानंतरही त्यांचा विचार न होणे ही बाब निश्चितच अनेकांना खटकली. कारण यादरम्यान 15 मिनिटांहून अधिक वेळ निघून गेली होती, जी रिकव्हरीसाठी पुरेसी होती. कदाचित त्यांचा फॉर्म आणि दिवस असल्याने एखाद-दोन चेंडूही ते खेळले असते तरी सामन्याचा निकाल वेगळा असता. परंतु, दोन्ही टीम मॅनेजमेंटच्या निर्णयांनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -