घरक्रीडाअनिल बिलावा मुंबई श्री

अनिल बिलावा मुंबई श्री

Subscribe

नवोदित मुंबई श्री पाठोपाठ मुंबई श्रीवरही अनिल बिलावाने कब्जा केला.

नवोदित मुंबई श्रीपाठोपाठ मुंबई श्रीचा किताबही हर्क्युलस जिमच्या अनिल बिलावाने पटकावला. मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आजवर एकाच मोसमात नवोदित मुंबई श्री जिंकल्यानंतर मुंबईच्या बाहुबलींना नमवून मुंबई श्री जिंकणारा अनिल बिलावा हा पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला आहे. अनिल बिलावाने सलग दोन स्पर्धा जिंकून एक नवा आणि अत्यंत दुर्मीळ असा इतिहास रचला, तसेच महिलांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली, तर पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकाराच्या १७० सेंमी उंचीच्या गटात आरकेएमचा महेश गावडे तर १७० सेंमीवरील उंचीच्या गटात बाल मित्र व्यायामशाळेचा शुभम कांदू अव्वल आला.

रविवारची संध्याकाळ लालबाग-परळकरच नव्हे तर समस्त मुंबईकरांसाठी संस्मरणीय ठरली. परळच्या रेल्वे वर्कशॉपच्या मैदानात मुंबईकरांना शरीरसौष्ठवाचे सौंदर्य आणि थरार एकाच वेळी अनुभवता आले. एकंदर नऊ गटातील ४८ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. प्रत्येक गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी सहाही खेळाडूंना प्रचंड संघर्ष करावा लागला, हेच या स्पर्धेचे यश होते. प्रत्येक गटात गटविजेता निवडताना जजेसना तारेवरची कसरत करताना कंपेरिजन घ्यावी लागली. ५५ किलो वजनी गटात वक्रतुंड जिमच्या नितीन शिगवणने माँसाहेब जिमच्या जितेंद्र पाटीलवर मात केली. ६० किलो वजनी गटात परब फिटनेसच्या देवचंद गावडेचे कडवे आव्हान आर.एम.भटच्या अविनाश वनेने मोडून काढले. वसंत जिमचा उमेश गुप्ता ६५ किलो वजनी गटात सरस ठरला. त्याने अनुभवी संदेश सकपाळला मागे टाकले, तर ७० किलो वजनी गटात बाल मित्र व्यायामशाळेच्या रोहन गुरवने संदीप कवडे, महेश पवारपेक्षा सरस सौष्ठवाचे प्रदर्शन करीत गटविजेतपदावर आपले नाव कोरले. ७५ किलो वजनी गटात ग्रेस जिमच्या भास्कर कांबळीने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

- Advertisement -

सुशील मुरकरचे गणित चुकले

गेल्या तीन महिन्यात धारावी श्री, दहिसर श्री, शंकर श्री, साहेब श्री,पुंचिकोरवे श्री अशा सलग पाच स्पर्धा जिंकणारा सुशील मुरकरच यंदाच्या मुंबई श्रीचा संभाव्य विजेता वाटत होता, पण वजन तपासणीच्या वेळी अचानक आलेला अनिल बिलावा ८० किलो वजनी गटात खेळला आणि ८१ किलो वजन असलेला सुशीलही एक किलो कमी करून त्याच गटात खेळला. बिलावाबद्दल कसलीही कल्पना नसल्यामुळे सुशीलचे 80 किलो वजनी गटात खेळल्याचे गणित चुकले आणि तो बिलावाकडून गटातच बाद झाला. खरं सांगायचं तर बिलावानंतर मुंबई श्रीमध्ये सुशीलच सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटू होता.

- Advertisement -

बिलावासमोर सर्व फिके

दोन महिन्यांपूर्वी नवोदित मुंबई श्री स्पर्धेद्वारे हर्क्युलस जिमचा अनिल बिलावा पहिल्यांदाच शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरला होता. त्यापूर्वी त्याचे नाव कुणाच्याही परिचयाचे नव्हते किंवा कुणीही ऐकले नव्हते. ती त्याची पहिलीच स्पर्धा होती. प्रशिक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा पष्ठ्या नवोदित मुंबई श्रीमध्ये उतरला आणि त्याने अनपेक्षित जेतेपद पटकावले. त्यानंतर तो थेट स्पार्टन मुंबई श्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या वेळी आला. प्राथमिक फेरीत त्याने सुशील मुरकरसह सुशांत रांजणकर, मोहम्मद शब्बीर शेखचा सहज पराभव केला. जेव्हा मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीसाठी नऊ गटातील सर्व खेळाडू एकाच मंचावर आले, तेव्हा बिलावासमोर बाकी गतविजेते फिके पडले. अनिलने जेतेपदाच्या देखण्या चषकासह दीड लाखांचे रोख इनामही जिंकले.

अनिल बिलावाच्या मागे प्रशिक्षक संजय चव्हाण

अवघ्या सहा महिन्यात अनिल बिलावाच्या आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ति म्हणजे प्रशिक्षक संजय चव्हाण. बिलावाची परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांनी त्याला नवोदित मुंबई श्रीनंतर फक्त आणि फक्त मुंबई श्रीवर लक्ष्य केंद्रित करायला सांगितले. बिलावाची मेहनत आणि आर्थिक गणिताची जुळवाजुळव यशस्वी झाली तर हा खेळाडू महाराष्ट्र श्रीमध्येही चमत्कार घडवू शकतो, असा विश्वास संजय चव्हाण यांनी बोलून दाखविला, पण येणार्‍या एक-दोन वर्षात बिलावा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीरसौष्ठव होईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मिसेस भावसार ठरली मिस मुंबई

मिस मुंबई स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र, यावेळी आरोग्य प्रतिष्ठानने अत्यंत अभूतपूर्वरित्या आयोजित केलेल्या महिलांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकाराला सात खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘गेल्या दोन वर्षांपासून घेतलेली मेहनत आणि घरच्यांच्या पाठबळामुळे मला हे शक्य झाले आहे. मिस मुंबई ही माझी पहिली पायरी आहे. मला माझ्या भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवायचे आहे. त्यासाठी लागणार्‍या मेहनतीसाठी आणि आव्हानांसाठी मी सज्ज आहे’, असे मंजिरी भावसार म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -