Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Syed Mushtaq Ali Trophy : अर्जुन तेंडुलकरचे मुंबईकडून पदार्पण; केली 'ही' कामगिरी 

Syed Mushtaq Ali Trophy : अर्जुन तेंडुलकरचे मुंबईकडून पदार्पण; केली ‘ही’ कामगिरी 

मुंबईला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. 

Related Story

- Advertisement -

वडील सचिन तेंडुलकरने गुजरातविरुद्ध रणजी करंडकात पदार्पण केल्याच्या जवळपास ३२ वर्षांनंतर मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या सिनियर संघाकडून खेळला. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या हरियाणाविरुद्धच्या सामन्यात अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, पहिल्या सामन्यात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश आले. ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्जुन खातेही न उघडता बाद झाला आणि गोलंदाजीत त्याने एक विकेट घेतली, पण त्यासाठी त्याने तीन षटकांत ३४ धावा खर्ची केल्या. मुंबईने हा सामना गमावला. या पराभवामुळे मुंबईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

सूर्यकुमार शून्यावर बाद

- Advertisement -

शुक्रवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईचा डाव १४३ धावांत आटोपला. डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने २१ चेंडूत ३५ धावा करत मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड आणि शिवम दुबे हे मुंबईचे मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज खातेही न उघडता बाद झाले. सर्फराज खान (३०) आणि अथर्व अंकोलेकर (३७) यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना इतरांची साथ लाभली नाही. हरियाणाने १४४ धावांचे लक्ष्य १७.४ षटकांत गाठत हा सामना जिंकला. हा मुंबईचा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला.

- Advertisement -