घरक्रीडाजोपर्यंत आनंद मिळतोय, तोपर्यंत खेळणार !

जोपर्यंत आनंद मिळतोय, तोपर्यंत खेळणार !

Subscribe

डावखुर्‍या युवराज सिंगने मुंबई इंडियन्सकडून आपला पहिला आयपीएल सामना खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३५ चेंडूंत ५३ धावांची खेळी केली. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. युवराजला मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आलेले नाही. त्याने भारतासाठी आपला अखेरचा सामना जून २०१७ मध्ये खेळला आहे. यंदाच्या आयपीएल लिलावातही त्याला पहिल्या फेरीत कोणीही आपल्या संघात घेतले नव्हते. मात्र, मुंबई इंडियन्सने त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याने पहिल्या सामन्यात मुंबईचा विश्वास सार्थकी लावला.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर तुला अजूनही का खेळावेसे वाटते असे विचारले असता युवराज म्हणाला, मागील दोन वर्षे माझ्यासाठी चढ-उतारांनी भरलेली होती आणि काय करावे याबाबत निर्णय घेणे मला अवघड जात होते, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी क्रिकेट खेळायला का सुरुवात केली होती? मी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली कारण मला त्यातून आनंद मिळायचा आणि तेव्हा मी भारतासाठी खेळत नव्हतो. मी १६ वर्षांखालील, १४ वर्षांखालील क्रिकेट खेळत होतो. त्यामुळे जोपर्यंत आनंद मिळत आहे, तोपर्यंत मी खेळणार आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मी स्वतःहूनच निवृत्त होईन. मी सचिनशीही (तेंडुलकर) बोलत असतो. कारण तो ३७, ३८, ३९ (वय) मधून गेला आहे आणि त्याला माहीत आहे की तेव्हा कसे वाटते. त्यामुळे मला वाटते की त्याच्याशी बोलल्याने माझ्यासाठी गोष्टी सोप्या होतात. मला अजूनही खेळाचा आनंद मिळत आहे, म्हणूनच मी खेळत आहे.

- Advertisement -

वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने २७ चेंडूंत ७ चौकार आणि ७ षटकारांची आतिषबाजी करत नाबाद ७८ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्यानंतर पंतच भारतासाठी यष्टीरक्षणाची धुरा सांभाळेल अशी अपेक्षा आहे. या सामन्यानंतर पंतची स्तुती करताना युवराज म्हणाला, रिषभने या सामन्यात अप्रतिम खेळी केली. मागील वर्षीही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगला खेळत आहे. त्याने इतक्या लहान वयातच परदेशात २ शतके केली आहेत. त्याला प्रोत्साहन देत राहण्याची गरज आहे आणि मला आशा आहे की तो आपल्यासाठी (भारतासाठी) एक महान खेळाडू बनेल.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने जम्मू-काश्मीरच्या १७ वर्षीय रसिक सलामला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली. युवा रसिकविषयी युवराजने सांगितले, रसिक ज्यादिवसापासून नेट्समध्ये आला आहे, तेव्हापासून त्याने सर्वांना प्रभावित केले आहे. तो ज्याप्रकारे चेंडू स्विंग करतो आणि त्याच्यात जो आत्मविश्वास आहे, त्यामुळेच त्याला (या सामन्यात) खेळवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अखेरच्या दोन चेंडूंवर १ षटकार आणि १ चौकार मारला गेला. हे वगळता त्याने खूपच चांगली गोलंदाजी केली. इतक्या लोकांसमोर पहिला सामना खेळण्याचा जो दबाव होता, तो त्याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. मला वाटते की पुढील २-३ वर्षांत तो खूपच खास गोलंदाज म्हणून पुढे येईल.

- Advertisement -

कोण आहे रसिक सलाम?

आयपीएलच्या १२ व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रसिक सलाम या युवा गोलंदाजाला संधी दिली. मागील मोसमात चांगले प्रदर्शन करणार्‍या लेगस्पिनर मयांक मार्कंडेला या सामन्यासाठी मुंबईच्या संघात स्थान मिळाले नाही. त्याच्याऐवजी रसिकला संधी मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा रसिक नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला. १७ वर्षीय रसिक आहे जम्मू-काश्मीरमधील अश्मुजी या छोट्याशा गावातला. आपल्या स्विंगसाठी ओळखल्या जाणार्‍या रसिकला मुंबई इंडियन्सने या लिलावात त्याची मूळ किंमत २० लाख रुपयांत खरेदी केले. रसिकने मागील वर्षीच्या सुरुवातीला एका जिल्हास्तरीय टी-२० स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने त्याची जम्मू-काश्मीरच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली. त्यानंतर तो मुख्य (सिनियर) संघाकडून विजय हजारे करंडकात खेळला. या स्पर्धेत त्याने २ सामन्यांत ३ विकेट घेतल्या होत्या. २०१८-१९ मोसमासाठी कर्णधार आणि सल्लागार म्हणून जम्मू-काश्मीर संघात दाखल झालेल्या इरफान पठाणने रसिकला पहिल्यांदा हेरले होते.

बुमराहविषयी…

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात भारत आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. दिल्लीच्या डावातील अखेरच्या चेंडूवर आपल्याच गोलंदाजीवर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना बुमराहचा तोल गेला आणि त्याला ही दुखापत झाली. आयपीएलनंतर काही दिवसांतच विश्वचषकाला सुरुवात होणार असल्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसवर सर्वांची नजर आहे. बुमराहची दुखापत फार गंभीर नसून, तो सावरला आहे. आम्ही त्याच्या सुधारणेवर नजर ठेवणार आहोत, अशी माहिती सामन्यानंतर मुंबई इंडियन्सकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -