घरक्रीडास्मिथ तिसर्‍या सामन्यातून आऊट

स्मिथ तिसर्‍या सामन्यातून आऊट

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ अ‍ॅशेस मालिकेतील तिसर्‍या सामन्यात खेळू शकणार नाही. या सामन्याला गुरुवारपासून हेडिंग्ली येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसर्‍या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू स्मिथच्या मानेला लागला आणि तो जागेवरच कोसळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या फिजिओ रिचर्ड सॉ यांनी स्मिथला मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला.

मात्र, त्याच्या चाचणी झाल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला, परंतु पाचव्या दिवशी पुन्हा त्याची चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याला डोकेदुखी, चक्कर आल्यासारखे वाटत होते. त्यामुळे त्याने दुसर्‍या सामन्यातून माघार घेतली. यातून तो अजून पूर्णपणे सावरलेला नसल्याने त्याला तिसर्‍या सामन्यात न खेळवण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय घेतला आहे. स्मिथने दुसर्‍या सामन्यात ‘नेक गार्ड’ असलेले हेल्मेट घातले नव्हते.

- Advertisement -

प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी स्पष्ट केले आहे की, स्टिव्ह स्मिथ अ‍ॅशेस मालिकेतील हेडिंग्ली येथे होणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. स्मिथने मंगळवारी झालेल्या संघाच्या सराव सत्रातही भाग घेतला नाही, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या वेबसाईटवरून दिली. स्मिथ तिसर्‍या कसोटीत खेळणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय संघाचे फिजिओ सॉ यांनी घेतला.

लबुसचेन्गला मिळणार संधी
स्टिव्ह स्मिथने या अ‍ॅशेस मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके, तर दुसर्‍या सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथने ९२ धावा केल्या. त्याने दुसर्‍या कसोटीच्या पाचव्या दिवशी सामन्यातून माघार घेतल्यानंतर त्याच्या जागी २५ वर्षीय मार्नस लबुसचेन्गला खेळण्याची संधी मिळाली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात संयमाने फलंदाजी करत ५९ धावा केल्या. त्यामुळे तिसर्‍या कसोटीतही स्मिथच्या जागी ऑस्ट्रेलियन संघात त्याचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -