पाकचा लाजिरवाणा पराभव

तिसर्‍या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १० विकेट राखून विजय

Mumbai
AUSTRALIA

गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा १० विकेट आणि ४९ चेंडू राखून पराभव केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची ही मालिका २-० अशी जिंकली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.

तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे त्यांना निर्धारित २० षटकांत ८ विकेट गमावत केवळ १०६ धावाच करता आल्या. पाकिस्तानच्या इमाम-उल-हक (१४) आणि इफ्तिकार अहमद (४५) या दोघांनाच दुहेरी धावसंख्या करता आली. ऑस्ट्रेलियाच्या केन रिचर्डसनने ३, तर सीन अ‍ॅबट आणि मिचेल स्टार्क यांनी २-२ बळी घेतली.

१०७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने केवळ ११.५ षटकांतच गाठले. त्यांचे सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार अ‍ॅरॉन फिंच यांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यामुळे त्यांनी ११ व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. अखेर फिंचने ३६ चेंडूत नाबाद ५२, तर वॉर्नरने ३५ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या मालिकेच्या ३ सामन्यांत मिळून केवळ ३ विकेट्स गमावल्या.

संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान : २० षटकांत ८ बाद १०६ (इफ्तिकार अहमद ४५, इमाम-उल-हक १४; केन रिचर्डसन ३/१८, सीन अ‍ॅबट २/१४, मिचेल स्टार्क २/२९) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : ११.५ षटकांत बिनबाद १०९ (अ‍ॅरॉन फिंच नाबाद ५२, डेविड वॉर्नर नाबाद ४८).

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here