भारत चारीमुंड्या चीत!

वॉर्नर, फिंचची शतके; ऑस्ट्रेलिया १० विकेट राखून विजयी

Mumbai
वॉर्नर, फिंच

कर्णधार अ‍ॅरॉन फिंच आणि डेविड वॉर्नर या सलामीवीरांच्या झंझावाती शतकांच्या जोरावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर १० विकेट व ७४ चेंडू राखून मात केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मायदेशात १० विकेटने मारा खाण्याची ही भारताची दुसरी वेळ होती, तर वानखेडेवरील हा सलग तिसरा (दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड) पराभव आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

भारताने सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर २५६ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना वॉर्नर आणि फिंच या अनुभवी जोडीने सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या १०० धावा ७५ चेंडूत पूर्ण झाल्या. वॉर्नरने ४० चेंडूत आणि फिंचने ५२ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. या दोघांनी पुढेही आक्रमक फलंदाजी सुरु ठेवले. तसेच नशिबाचीही त्यांना थोडीफार साथ लाभली. ३१ व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर चौकार लगावत वॉर्नरने आपले एकदिवसीय क्रिकेटमधील १८वे शतक झळकावले आणि त्याने ऑस्ट्रेलियाच्या २०० धावाही फलकावर लावल्या. काही षटकांनंतर फिंचने आपले एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६ वे शतक पूर्ण केले. अखेर वॉर्नरने शमी टाकत असलेल्या ३८ व्या षटकात सलग दोन चौकार लगावत ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकवून दिला. वॉर्नर ११२ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांसह १२८, तर फिंच ११४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह ११० धावांवर नाबाद राहिला. तसेच या दोघांनी २५८ धावांची भागीदारी केली, जी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी होती.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अनुभवी शिखर धवन आणि फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलपैकी रोहित शर्माचा सलामीचा साथी कोण असणार यावर सामन्याआधी बरीच चर्चा झाली. अखेर डावखुर्‍या धवननेच रोहितसोबत भारताच्या डावाची सुरुवात केली. मिचेल स्टार्कने मात्र रोहितला (१०) फारकाळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. यानंतर धवन आणि तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलने भारताचा डाव सावरला. पहिल्या पॉवर-प्लेच्या १० षटकांनंतर भारताची १ बाद ४५ अशी धावसंख्या होती. १२ व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर चौकार लगावत धवनने भारताच्या ५० धावा फलकावर लावल्या. तर १९ व्या षटकात त्याने आपले एकदिवसीय कारकिर्दीतील २८ वे अर्धशतक झळकावले. याच षटकात भारताच्या १०० धावाही पूर्ण झाल्या. भारतीय संघ २५ षटकांनंतर १ बाद १२६ असा सुस्थितीत होता. मात्र, यानंतर त्यांची पडझड सुरु झाली.

डावखुरा फिरकीपटू अ‍ॅश्टन एगरने राहुलला ४७ धावांवर बाद केले. राहुल आणि धवनने दुसर्‍या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली. पुढच्याच षटकात कमिन्सने धवनला एगरकरवी झेलबाद करत भारताला आणखी एक झटका दिला. धवनने ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या. पुढे कर्णधार विराट कोहली (१६) आणि श्रेयस अय्यर (४) झटपट माघारी परतल्याने भारताची १ बाद १३४ वरुन ५ बाद १६४ अशी अवस्था झाली. यानंतर रविंद्र जाडेजा (२५) आणि रिषभ पंत (२८) यांनी काहीकाळ चांगली फलंदाजी करत ४१ व्या षटकात भारताच्या २०० धावा फलकावर लावल्या. मात्र, हे दोघे सलग दोन षटकांत बाद झाले. तळाच्या फलंदाजांनाही फारसे योगदान देता न आल्याने भारताचा डाव ४९ व्या षटकात २५५ धावांवर आटोपला.

रिषभ पंतला कन्कशन!

भारताचा युवा खेळाडू रिषभ पंतला फलंदाजीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे यष्टिरक्षण करता आले नाही. पंतला २८ धावांवर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने उसळी घेणारा चेंडू टाकत बाद केले. भारताच्या डावातील ४४ व्या षटकात पंतच्या बॅटची कड घेऊन चेंडू हेल्मेटला आदळला. त्यामुळे कन्कशनच्या नियमानुसार त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि तो यष्टिरक्षण करण्यासाठी येऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने यष्टिरक्षण केले.

सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात निषेध!

वानखेडे येथे झालेल्या सामन्यात काही चाहत्यांनी सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात निषेध दर्शवला. त्यांनी पांढर्‍या रंगाचे ’से नो टू एनआरसी’ असा संदेश लिहिलेले टी-शर्ट घालून आपला विरोध दर्शवला. तसेच काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळत नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि पोलिसांकडून ही अफवा असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here