Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : रोहित शर्माला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार - लायन

IND vs AUS : रोहित शर्माला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार – लायन

७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सिडनी कसोटीत रोहित खेळण्याची शक्यता आहे. 

Related Story

- Advertisement -

आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे भारताचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका, तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकला. मात्र, ७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सिडनी कसोटीत रोहित खेळण्याची शक्यता आहे. त्याला मयांक अगरवाल किंवा हनुमा विहारीच्या जागी संधी मिळू शकेल. रोहित फारच उत्कृष्ट खेळाडू असून त्याच्या समावेशाने भारताची फलंदाजी मजबूत होईल, असे ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नेथन लायनला वाटते. परंतु, त्याला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाज तयार असल्याचे लायन म्हणाला.

रोहित जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे हे गोलंदाज म्हणून आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. मात्र, आम्हाला आव्हानांचा सामना करायला आवडते. रोहितच्या समावेशाने भारतीय संघ नक्कीच मजबूत होईल. त्याला संघात स्थान देताना भारतीय संघ कोणत्या खेळाडूला वगळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. मात्र, आम्ही रोहितसाठी योग्य ती योजना आखू. आमचे सर्व गोलंदाज रोहितला रोखण्यासाठी तयार आहेत. आम्हाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्याच्यावर दबाव टाकावा लागेल, असे लायनने सांगितले.

- Advertisement -

तिसऱ्या कसोटीत रोहित खेळणार असला तरी केवळ त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकेल. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रहाणेलाही रोखण्याचा विचार करावा लागणार असल्याचे लायनला वाटते. रहाणे अप्रतिम फलंदाज आहे. स्लेजिंगचा त्याच्यावर परिणाम होत नाही. फलंदाजी करताना तो आम्हाला प्रत्त्युत्तरही देत नाही. तो कितीही दबावात संयम राखतो ही त्याची खास गोष्ट आहे. त्यामुळे त्याचे लक्ष विचलित करणे अवघड आहे. परंतु, आम्हाला त्याला रोखावेच लागेल, असेही लायनने नमूद केले.

- Advertisement -