नदाल, मेदवेदेव्ह तिसर्‍या फेरीत

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस

Mumbai
rafael nadal
राफेल नदाल

स्पेनच्या अव्वल सीडेड राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने दुसर्‍या फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या फेडरिको देल्बोनिसवर ६-३, ७-६, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली. नदालने या सामन्यात तब्बल २० वेळा देल्बोनिसची सर्व्हिस मोडण्याची संधी निर्माण केली. आता त्याचा तिसर्‍या फेरीत स्पेनच्याच पाब्लो कॅरेनो बुस्ताशी सामना होईल.

मागील वर्षी अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठणार्‍या रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हलाही आपला दुसर्‍या फेरीतील सामना जिंकण्यात यश आले. त्याने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझ पोर्टेरोला ७-१, ६-१, ६-३ असे पराभूत केले. तसेच जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने इगोर गेरासीमोव्हवर ७-६, ६-४, ७-५ अशी मात करत तिसरी फेरी गाठली.

प्लिस्कोवाची आगेकूच

ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीत दुसर्‍या सीडेड कॅरोलिना प्लिस्कोवाने जर्मनीच्या लॉरा सिगमंडचा ६-३, ६-३ असा पराभव करत तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. प्लिस्कोवाने या सामन्यात चारवेळा सिगमंडची सर्व्हिस मोडली. तसेच चौथ्या सीडेडने सिमोन हालेपने ब्रिटनच्या हॅरीएट डार्टवर ६-२, ६-४ अशी मात करत स्पर्धेत आगेकूच केली.