ऑस्ट्रेलियाला अजूनही प्रतिस्पर्धी घाबरतात! – स्टिव्ह वॉ

Mumbai
Steve Waugh

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरु होणारा क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचे यजमान इंग्लंड आणि भारत या संघांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघही हा विश्वचषक जिंकू शकेल, असे त्यांचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉने व्यक्त केले आहे. तसेच स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरच्या समावेशाने ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला असून या संघाला अजूनही प्रतिस्पर्धी संघ घाबरतात असे वॉ याला वाटते.

प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलियाला अजूनही घाबरतात. या ऑस्ट्रेलियन संघात किती प्रतिभा आहे, हे इतर संघाना ठाऊक आहे. मागील १२ महिन्यांत ऑस्ट्रेलियन क्रिकेटने बरेच उतार पाहिले आहेत. मात्र, आता हे सगळे विसरून हा संघ विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. या संघात त्यांचे सर्वोत्तम खेळाडू स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांचे पुनरागमन झाल्याने हा संघ अधिक मजबूत झाला आहे, असे वॉ म्हणाले.

२०१८च्या सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाला १८ पैकी ३ सामनेच जिंकण्यात यश आले होते. मात्र, या संघाने आपल्या खेळात सुधारणा करत मागील २ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. याबाबत वॉ म्हणाले, ऑस्ट्रेलियाचा काहीकाळ फॉर्म फार खराब होता. मात्र, मागील २ मालिकांमध्ये त्यांनी आपल्या खेळात सुधारणा केली आहे. त्यातच आता स्मिथ आणि वॉर्नरही संघात परतला आहे. त्यामुळे या विश्वचषकात हा संघ चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. हा संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे, असे मी म्हणणार नाही, पण ते नक्कीच चांगले खेळतील. इंग्लंड हा विश्वचषक जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे. त्यांनी मागील काही वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदाही मिळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांमध्ये हा विश्वचषक जिंकण्याची क्षमता आहे असे मला वाटते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here