घरक्रीडापार्थ हेंद्रे शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित

पार्थ हेंद्रे शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित

Subscribe

प्रबोधनकार ठाकरे संकुलात करतो जलतरणाचा सराव

विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा दिव्यांग जलतरणपटू पार्थ हेंद्रे याला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. रोख रकमेचा धनादेश, प्रमाणपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

२४ वर्षीय पार्थला जन्मापासूनच स्पायना बायफिडा विथहायड्रॉइफेलस हा आजार आहे. त्यामुळे त्याला दोन्ही पायावर उभे राहता येत नव्हते. परंतु, डॉ. वालावलकर यांच्या सल्ल्यानुसार पार्थने सतीश निंबाळकर आणि राजू पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्यास सुरुवात केली. त्याने २००३ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी संकरॉक ते गेटवे ऑफ इंडिया हे ५ किमीचे अंतर १ तास, ४ मि. १० सेकंदात पार केले. त्याच वर्षी त्याने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ किमीचे अंतर ६ तास १३ मि. ३१ सेकंदात पूर्ण केले. त्यामुळे पार्थचे नाव लिम्का बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

- Advertisement -

त्यानंतर पार्थने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सरावाला सुरुवात केली. त्याला संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे, मुख्य कार्याधिकारी प्रितम केसकर, तसेच जलतरणाचे मुख्य प्रशिक्षक संदीप नेवाळकर आणि फिटनेससाठी डॉ. चैतन्य बढे यांचे सहकार्य मिळत आहे. आतापर्यंतच्या पार्थवर १३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

पार्थने राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तररावरील जलतरण स्पर्धा, तसेच समुद्री स्पर्धांमध्ये मिळून ५७ सुवर्ण, ३९ रौप्य आणि २२ कांस्य अशी एकूण ११७ पदके पटकावली आहेत. तसेच त्याने वर्ल्ड पॅरा स्विमिंग सिरीज २०१७ बर्लिन आणि जर्मनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता. पार्थआधी प्रबोधनकार ठाकरे संकुलातील तुषार गितये (डायव्हिंग), वंदीता रावल (जिम्नॅस्टिक्स), द्विजा आशर (जिम्नॅस्टिक्स), नेहा साप्ते (नेमबाजी), स्वप्नाली यादव (जलतरण), हरीश परब (प्रशिक्षक-जिम्नॅस्टिक्स) यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहेत.

- Advertisement -

खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंचा सन्मान
शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्यात खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यात अनुष्का पवार (जिम्नॅस्टिक्स), इशिता रेवाळे (जिम्नॅस्टिक्स) आणि रुद्राक्ष पाटील (नेमबाजी) या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या खेळाडूंचा समावेश होता. त्यांना रोख रकमेचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -