घरक्रीडाबंड्या मारुती मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

बंड्या मारुती मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

Subscribe

विजय क्लब, स्वस्तिक क्रीडा मंडळ, जय भारत क्रीडा मंडळ, शिवशंकर सेवा मंडळ या संघांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत विजय क्लबचा स्वस्तिकशी आणि जय भारतचा शिवशंकरशी सामना होणार आहे.

ना. म. जोशी मार्ग येथील ललित क्रीडा केंद्राच्या प्रांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या सामन्यात विजय क्लबने अंकुर स्पोर्ट्सचा ३७-२४ असा पराभव केला. अमित चव्हाण, झैद कवठेकर यांच्या झंझावाती चढाया आणि त्याला श्री भारती, अभिषेक रामाणे यांच्या भक्कम पकडीची मिळालेली साथ यामुळे विजय क्लबने मध्यंतराला २१-०६ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात यंदाचा मोसम गाजवणार्‍या अंकुरच्या सुशांत साईलला सूर सापडला, पण तोपर्यंत सामना हातून निसटला होता. दुसर्‍या सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने गुड मॉर्निंग स्पोर्ट्सवर ३९-२० अशी मात केली. पहिल्या डावात १७-०७ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या स्वस्तिकने दुसर्‍या डावात मात्र सावध खेळ करत आपला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. सुयोग राजापकर, सिद्धेश पांचाळ यांच्या आक्रमक चढाया आणि अभिषेक चव्हाण, अक्षय बर्डे यांचा बचाव स्वस्तिकच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. गुड मॉर्निंगच्या योगेश्वर खोपडे आणि सुदेश कुळे यांनी चांगली लढत दिली.

- Advertisement -

जय भारत क्रीडा मंडळाने उजाला क्रीडा मंडळाला ३४-२६ असे रोखत उपांत्य फेरीत धडक दिली. अभिजित होडे, सागर काविलकर, ओमकार मोरे यांच्या चतुरस्त्र खेळामुळे जय भारताने मध्यंतरापर्यंत १९-०९ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र उजालाच्या अक्षय भोईर, सुमित पाटील यांनी चढाईत झटपट गडी टिपत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांना तहा शेखने उत्तम पकडी करीत चांगली साथ दिली. मात्र, शेवटी पहिल्या डावात घेतलेली आघाडी जय भारतच्या कामी आली. तसेच चुरशीच्या सामन्यात शिवशंकर सेवा मंडळाने सत्यम क्रीडा मंडळाचे कडवे आव्हान ४३-३० असे संपुष्टात आणले. निलेश साळुंखे, गणेश जाधव यांच्या अप्रतिम चढाया, तर तुषार भोईर, सूरज बनसोडे यांच्या आक्रमक पकडी यामुळे शिवशंकरकडे मध्यंतराला २४-१४ अशी आघाडी होती. नितीन देशमुख, राज चव्हाण, अनिकेत म्हात्रे यांनी चांगला खेळ करूनही सत्यमला पराभवाला सामोरे जावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -