बंड्या मारुती मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

Mumbai
विजय क्लब,अमर क्रीडा बाद फेरीत

विजय क्लब,उजाला क्रीडा मंडळ, अमर क्रीडा मंडळ, शिवशंकर मंडळ,गुड मार्निंग स्पोर्ट्स, ओम कबड्डी,जय भारत मंडळ,अमरहिंद मंडळ,अंकुर स्पोर्ट्स,मावळी मंडळ,सत्यम सेवा मंडळ,छत्रपती शिवाजी मंडळ,स्वस्तिक मंडळ आणि गोलफादेवी मंडळ यांनी बंड्या मारुती मंडळाने आयोजित केलेल्या स्थानिक पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ना.म.जोशी मार्ग येथील ललित क्रीडा केंद्राच्या प्रांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेचा शनिवारी दुसरा दिवस होता.

अंकुर स्पोर्ट्सने ‘इ’ गटात मावळी मंडळाचा ४४-२६असा पाडाव करीत सलग दुसरा विजय मिळवित बाद फेरी गाठली. सुशांत आणि सुमित या साईल बंधूंच्या भन्नाट चढाया त्याला मिलिंद कोलतेची मिळालेली पकडीची साथ यामुळे अंकुरने मध्यांतराला २२-०८अशी भक्कम आघाडी घेतली होती. मावळी मंडळाच्या राजेश भिलारे, निशिकांत पाटील यांना उत्तरार्धात सूर सापडला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

‘ग’ गटात गोलफादेवीने श्री हनुमानचा ३१-२७ असा पाडाव केला. विश्रांतीपर्यंत १३-१४ अशा एका गुणाने पिछाडीवर पडलेल्या गोलफादेवीच्या अक्षय बिडू,दुर्वेश पाटील, अनिकेत डावरे यांनी उत्तरार्धात आपला खेळ अधिक गतिमान करीत हा विजय साकारला. सतेज शेडगे,संदीप हरडे यांचा खेळ श्री हनुमानला विजयी करण्यास कमी पडला. ‘फ’ गटात छत्रपती शिवाजीने शिवशक्तीला ३६-२२ असे नमवित बाद फेरी गाठली.अर्जुन शिंदे, शुभम शिर्के या विजयात चमकले.मकरंद मसुरकर,विराज सोहनी शिवशक्तीकडून बरे खेळले.

‘क’ गटात गुड मॉर्निंगने धीरज रोकडे,सुदेश कुळे,अजय शिंदे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ओम कबड्डी संघाचा ३१-१६असा पाडाव करीत या गटात अग्रक्रम पटकावला. ओम कबड्डी संघाने वीर परशुरामचा ३६-१९ असा पराभव करीत या गटात दुसरे स्थान प्राप्त केले. अक्षय भोपी, राहुल भोसले या विजयाचे शिल्पकार ठरले.आयत्यावेळी जय शिव- बदलापूर हा संघ न आल्यामुळे संधी मिळालेल्या अमरहिंदने नवं जवानवर ३०-२०अशी मात करीत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. विश्रांतीपर्यंत १०-१० अशा समान गुणांवर असलेल्या या सामन्यात अमरहिंदच्या निशांत देवकर, निलेश सकपाळ यांनी टॉप गियर टाकत सामना आपल्या बाजूने झुकविला.नवं जवानच्या सुरेश चव्हाण, रोहित डिंगणकर यांचा उत्तरार्धात प्रभाव पडला नाही.

विजय क्लबने सुनील स्पोर्ट्सवर ३३-०९ अशी मात करीत ‘ड’ गटातून बाद फेरी गाठली. अमित चव्हाण, झैद कवठेकर,विजय दिवेकर विजय कडून उत्तम खेळले. सुनीलची मदार अजूनही ज्येष्ठ खेळाडू परेश चव्हाण यांच्यावरच अवलंबून आहे. ‘फ’ गटात सत्यम मंडळाने छत्रपती शिवाजी मंडळाचा ३९-३७ असा निसटता पराभव करीत या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. पराभूत छत्रपती शिवाजीने दुसरे स्थान मिळविले. नितीन देशमुख, मोनिक सारंग,समीर नलावडे सत्यमकडून तर शुभम शिर्के, अजिंक्य पाटील, शुभम सावंत छत्रपती शिवाजी मंडळाकडून उत्तम खेळले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here