घरक्रीडाविंडीजचं घोडं अडतंय कुठं?

विंडीजचं घोडं अडतंय कुठं?

Subscribe

शाकिब अल हसनने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने वर्ल्डकपच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. हा जेसन होल्डरच्या विंडीजचा पाच सामन्यांतील तिसरा पराभव होता, तर त्यांना केवळ एक सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दहा संघांचा समावेश असलेल्या या वर्ल्डकपच्या गुणतक्त्यात विंडीजचा संघ सातव्या स्थानी घसरला आहे. क्रिस गेल, आंद्रे रसेल, कर्णधार होल्डर, शाई होप अशा उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असल्यामुळे आणि आपल्या दिवशी कोणत्याही संघाचा पराभव करण्याची क्षमता असल्यामुळे विंडीजला हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी ‘डार्क हॉर्स’ मानले जात होते. मात्र, सध्यातरी तसे होताना दिसत नाही. त्यांना हा वर्ल्डकप जिंकण्याची आशा असल्यास आपल्या खेळात सुधारणा करणे गरजेचे आहे.

१९७०-८० च्या काळात विंडीजचा संघ हा जगातील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखला जायचा. उंचपुरे, तेजतर्रार वेगवान गोलंदाज आणि तडाखेबाज फलंदाज यांच्यामुळे विंडीज संघाची दहशत होती, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांनी पहिले (१९७५, १९७९) दोन वर्ल्डकप जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, १९९० पासून या संघाला जणू उतरती कळा लागली आहे. टी-२० क्रिकेटच्या उदयामुळे या संघाची कामगिरी अधिकच खालावली. त्यांचे बरेच प्रतिभावान खेळाडू फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असल्याने त्यांना विविध देशांत होणार्‍या टी-२० स्पर्धांमध्ये मागणी वाढू लागली. परिणामी विंडीजला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुबळ्या संघानिशी मैदानात उतरावे लागले.

- Advertisement -

सिनियर खेळाडू आणि क्रिकेट बोर्डाचे अधिकारी यांच्यात बरेच मतभेद होते. त्यांच्यातील भांडण इतके विकोपाला पोहोचले होते की विंडीज संघाने २०१६ टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावल्यानंतर त्यांचा कर्णधार डॅरेन सॅमीने या अधिकार्‍यांवर मैदानावरूनच टीका केली. मात्र, त्यानंतर युवा होल्डरच्या नेतृत्त्वात नवा विंडीज संघ उभा राहत होता. वर्ल्डकपला काहीच काळ बाकी असताना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे आणि निवड समितीचे नवे अध्यक्ष नेमण्यात आले. वर्ल्डकपआधी सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंग्लंडला विंडीजने २-२ असे बरोबरीत रोखले. त्यांच्या खेळाडूंनी आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली. मैदानातील आणि मैदानाबाहेरील या साकारात्मक बदलांमुळे वर्ल्डकपमध्ये विंडीजपासून इतर संघांनी सावध राहिले पाहिजे, असे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले. मात्र, वर्ल्डकपमध्ये त्यांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश येत आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांनी उसळी घेणार्‍या चेंडूंचा भडीमार करत फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले. त्यामुळे पाकचा डाव अवघ्या १०५ धावांत संपुष्टात आला. विंडीजने हे आव्हान १४ व्या षटकातच पूर्ण करत या स्पर्धेची विजयी सुरुवात केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची ४ बाद १४९ अशी धावसंख्या होती, परंतु त्यानंतर त्यांच्या फलंदाजांना संयमाने आणि हुशारीने फलंदाजी करण्यात अपयश आल्याने त्यांचा पराभव झाला.

- Advertisement -

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांची मजल मारल्यानंतर गोलंदाजांच्या स्वैर मार्‍यामुळे ते पुन्हा एकदा पराभूत झाले. कधी खराब फलंदाजी, तर कधी निराशाजनक गोलंदाजीमुळे या संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत मिळून जोपर्यंत विंडीजचा संघ सर्वोत्तम कामगिरी करणार नाही, तोपर्यंत त्यांना अपेक्षित कामगिरी करता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -