घरक्रीडागांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी!

गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी!

Subscribe

सचिवपदी अमित शहांचा मुलगा जय शहा?

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड होणार हे जवळपास निश्चित झालीआहे. भारतीय खेळांमधील सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीसीसीआयची निवडणूक लढण्यास इच्छुक असणार्‍यांना अर्ज भरण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवसापर्यंत गांगुली सोडून कोणीच अर्ज भरला नाही. त्यामुळे २३ ऑक्टोबरला होणार्‍या बीसीसीआयच्या निवडणुकीत गांगुलीची बिनविरोध अध्यक्षपदी नेमणूक होणार हे निश्चित आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांची सचिव म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. जय शहा यांचे गुजरात क्रिकेट असोसिएशनने नामांकन केले आहे.

भारताचा माजी कर्णधार नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद भूषवणार हे जवळपास निश्चित आहे. रविवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बीसीसीआयची निवडणूक लढण्यास इच्छुक असणार्‍यांना अर्ज भरण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस होता. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणारा एकमेव उमेदवार होता. त्यामुळे त्याची निवड केवळ औपचारिकता उरली आहे.

- Advertisement -

बीसीसीआयच्या निवडणुकीत अनुराग ठाकूर यांचा एक आणि एन श्रीनिवासन यांचा दुसरा असे दोन गट विरोधात होते. रविवारी झालेल्या बैठकीत दोन्ही गट आपला उमेदवार बीसीसीआयचा अध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्नशील होते. अखेर सर्वांनी गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गांगुलीला केवळ १० महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. या काळात बीसीसीआयची प्रतिमा बदलण्याचे गांगुलीचे लक्ष्य आहे.

माझे नाव अध्यक्षपदासाठी निवडण्यात आले आहे याची माहिती मला रविवार रात्री मिळाली. २००० साली जेव्हा माझी भारताचा कर्णधार म्हणून निवड झाली, तेव्हा संघासमोर काही अडचणी होत्या. त्यामुळे कठीण परिस्थितीत योग्य काम करणारा म्हणून माझ्याकडे पाहिले जाते, ही समाधानकारक बाब आहे. सध्याचा काळ भारतीय क्रिकेट प्रशासनासाठी महत्त्वाचा आहे. मागील तीन वर्षांत बर्‍याच गोष्टी घडल्या आहेत. आता राजीव शुक्ला यांनी घोषित केलेली आठ सदस्यांची समिती बीसीसीआयची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करेल. मी समितीसोबत मिळून जर सकारात्मक बदल करू शकलो, तर त्याचा आनंद होईल. आम्हाला बर्‍याच गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे. भारतीय संघाने मैदानात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर संघाने खेळात खूपच सुधारणा केली आहे. त्यांनी यापुढेही चांगली कामगिरी करत राहण्यासाठी आम्ही आमचे काम योग्य पद्धतीने गरजेचे आहे, असे गांगुली म्हणाला.

- Advertisement -

याआधी कर्नाटकचे ब्रिजेश पटेल बीसीसीआयचे अध्यक्ष होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. श्रीनिवासन यांचा गट पटेल यांच्या नावासाठी आग्रही होता. पटेल यांची अध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी श्रीनिवासन यांनी शनिवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शनिवारीच गांगुलीने शहा यांना भेटत आपण अध्यक्ष बनण्यास उत्सुक आहोत, असे सांगितले. गांगुलीला अनुराग ठाकूर यांच्या गटाने पाठिंबा दिल्याची शक्यता आहे. ब्रिजेश पटेल यांची आता आयपीएलच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. तसेच अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांची बीसीसीआयच्या सचिवपदी, तर हिमाचल प्रदेशच्या अरुण कुमार धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -