IPL : स्टोक्स निम्म्या स्पर्धेला मुकणार? 

स्टोक्स सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानला जातो.

ben stokes
बेन स्टोक्स

राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स आयपीएल स्पर्धेच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने तो सध्या त्यांच्यासोबत न्यूझीलंडमध्ये आहे. तो राजस्थानच्या जवळपास निम्म्या स्पर्धेला मुकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. स्टोक्स सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानला जातो. त्याला राजस्थानने १२.५ कोटी रुपये इतकी रक्कम देत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले होते. त्यामुळे त्याची उणीव राजस्थानला नक्कीच भासेल.

त्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार

न्यूझीलंडमध्ये स्टोक्सला नियमानुसार १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. आता तो त्याच्या वडिलांना भेटू शकणार आहे. त्यांच्यासोबत त्याला थोडा वेळ घालवायला आवडेल. त्यानंतर तो युएईत दाखल झाल्यावर त्याला पुन्हा क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. त्यामुळे तो निम्म्या आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. आम्ही त्याची परिस्थिती समजू शकतो. आम्ही त्याला फोनही करणार नाही. सध्या त्याने कुटुंबासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. काही काळानंतर आयपीएलमध्ये खेळण्याबाबत आम्ही त्याच्याशी चर्चा करू, असे राजस्थान रॉयल्समधील सूत्रांचे म्हणणे होते. यंदा युएईत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. राजस्थानचा सलामीचा सामना २२ सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होईल.