IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल गोलंदाजांवर अवलंबून – झहीर खान

भारत-ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.  

shami and bumrah
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह 

भारत आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमधील एकदिवसीय मालिकेला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर या दोन संघांमध्ये टी-२० आणि कसोटी मालिकाही होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेची क्रिकेट चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. खासकरून भारताची फलंदाजी विरुद्ध ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी या द्वंद्वाकडे सर्वांचे लक्ष असते. मात्र, मागील काही वर्षांपासून भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीतही खूप सुधारणा झाली आहे. त्यामुळे यंदाच्या मालिकेचा निकाल दोन्ही संघांतील गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून असेल, असे विधान भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने केले.

ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडूला चांगली उसळी मिळते आणि वेगही असतो. त्यामुळे ज्या संघाचे गोलंदाज अधिक दर्जेदार कामगिरी करतील, त्या संघाला एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही मालिका जिंकण्याची जास्त संधी असेल. गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवर रोखणे खूप गरजेचे असते. सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांबद्दल चर्चा होताना जी नावे घेतली जातात, त्यातील जवळपास सर्वच गोलंदाज या मालिकेत खेळताना दिसणार आहेत, असे झहीरने सांगितले.

भारताची सध्याची गोलंदाजांची फळी ही भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम मानली जाते. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव या तेज चौकडीने मागील दोन-तीन वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी करताना भारताला सामने जिंकवून दिले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात पॅट कमिन्स, जॉश हेझलवूड, मिचेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांसह नेथन लायनसारख्या उत्कृष्ट फिरकीपटूचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही संघांतील फलंदाजांना धावांसाठी झुंजावे लागणार आहे.