आरबी लॅपझिंगची क्लोनवर मात

बुंडसलिगा फुटबॉल स्पर्धा

Mumbai

आरबी लॅपझिंगने जर्मनीतील फुटबॉल स्पर्धा बुंडसलिगाच्या सामन्यात एफसी क्लोन संघावर ४-२ अशी मात केली. हा लॅपझिंगच्या यंदाच्या मोसमात २९ सामन्यांतील १६ वा विजय होता. त्यामुळे ५८ गुणांसह ते गुणतक्त्यात तिसर्‍या स्थानी आहेत. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेल्या मोंचेनग्लाडबाग आणि बायर लेव्हरकुसेन या संघांच्या खात्यात ५६-५६ गुण असल्याने लॅपझिंगसाठी हा सामना जिंकणे फार महत्त्वाचे होते. गुणतक्त्यातील अव्वल चार संघांना पुढील मोसमात चॅम्पियन्स लीग स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे.

या सामन्यात सातव्या मिनिटाला जहॉन कोर्डोबाने गोल करत क्लोनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, लॅपझिंगनेही आपल्या खेळात सुधारणा केली. २० व्या मिनिटाला पॅट्रिक शिक आणि ३८ व्या मिनिटाला क्रिस्तोफर एनकुकूने केलेल्या गोलमुळे मध्यंतराला लॅपझिंगकडे २-१ अशी आघाडी होती. उत्तरार्धातही त्यांनी आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला.

५० व्या मिनिटाला टिमो वर्नरने गोल करत लॅपझिंगची आघाडी ३-१ अशी वाढवली. वर्नरचा हा यंदाच्या मोसमातील आपला २५ वा गोल होता. ५५ व्या मिनिटाला अँथनी मोडेस्टने केलेल्या गोलमुळे क्लोनला पुनरागमनाची आशा निर्माण झाली होती. मात्र, दोन मिनिटानंतरच डॅनी ऑल्मोने पुन्हा लॅपझिंगला दोन गोलची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखत हा सामना ४-२ असा जिंकला.