गोलंदाजांच्या यशाचे श्रेय कर्णधार कोहलीला -अरुण

Mumbai
भारत अरुण यांचे उद्गार

भारताच्या गोलंदाजांनी मागील काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा या तेज त्रिकुटाला कसोटी सामन्यांमध्ये सातत्याने २० विकेट्स मिळवण्यात यश येत आहे. बुमराह सध्या दुखापतग्रस्त असल्याने शमी आणि ईशांतवरील जबाबदारी वाढली आहे.

त्यांनी ही जबाबदारी चोख पार पाडत भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना मिळत असलेल्या यशाचे श्रेय कर्णधार विराट कोहलीला जाते, असे भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण म्हणाले.

प्रत्येक गोलंदाज वेगळा असतो. बुमराह आणि शमी यांना एकावेळी कमी षटके टाकायला आवडतात, तर ईशांत एका स्पेलमध्ये ७ किंवा त्यापेक्षा जास्त षटके टाकू शकतो. कोहली गोलंदाजांना हवी तितकी षटके टाकण्याची मोकळीक देतो. त्यामुळे गोलंदाजांना यश मिळत आहे. तो त्यांच्यावर ठरविक षटके टाकलीच पाहिजेत असा दबाव टाकत नाही.

कर्णधार आम्हाला मोकळीक देतो असे शमीने एका मुलाखतीतही सांगितले आहे. आपण यशस्वी होण्यासाठी किती षटके टाकली पाहिजेत हे गोलंदाजांना ठाऊक आहे आणि ते याबाबत कर्णधाराशी संवाद साधतात, असे अरुण म्हणाले.