घरक्रीडाकर्णेवारच्या शतकामुळे विदर्भाचे पारडे जड

कर्णेवारच्या शतकामुळे विदर्भाचे पारडे जड

Subscribe

इराणी करंडक

अक्षय कर्णेवारचे झुंजार शतक आणि त्याला तळाच्या इतर फलंदाजांनी दिलेली साथ यामुळे विदर्भाने इराणी करंडकात शेष भारताविरुद्ध पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी मिळवली. शेष भारताने केलेल्या ३३० धावांचे उत्तर देताना विदर्भाने आपल्या पहिल्या डावात ४२५ धावा केल्या. शेष भारताची दुसर्‍या डावात सामन्याच्या तिसर्‍या दिवसअखेर २ बाद १०२ अशी धावसंख्या आहे.

विदर्भाने ६ बाद २४५ वरून पुढे खेळताना तिसर्‍या दिवसाची चांगली सुरुवात केली. अक्षय वाडकर आणि कर्णेवार यांनी पहिल्या सत्राच्या १३ षटकांत ६० धावा जोडल्या. मात्र, संयमाने फलंदाजी करत असलेल्या वाडकरला ७३ धावांवर राहुल चहारने त्रिफळाचित करत ही जोडी फोडली. त्याने आणि कर्णेवारने सातव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. दुसरीकडे कर्णेवारने आक्रमक फलंदाजी करत ५७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला अक्षय वखरेने सावधपणे फलंदाजी करत चांगली साथ दिली. या डावाच्या ११४ व्या षटकात दोन्ही संघांची धावसंख्या समान असताना वखरेने तन्वीर उल-हकच्या चेंडूवर एक धाव काढत विदर्भाला आघाडी मिळवून दिली, तर पुढेही कर्णेवारने आपली आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली. त्याने लंचच्या आधीच्या अखेरच्या षटकात डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्र जाडेजाला षटकार लगावत आपले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. त्यामुळे लंचपर्यंत विदर्भाची ७ बाद ३७७ अशी धावसंख्या होती.

- Advertisement -

लंचनंतरच्या दुसर्‍याच षटकात चहारने कर्णेवारला १०२ धावांवर माघारी पाठवले. कर्णेवारने या धावा १३३ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने केल्या. पुढे चहारनेच वखरेला २० धावांवर बाद केले. त्यामुळे विदर्भाची ९ बाद ३८६ अशी धावसंख्या झाली होती. यानंतर रजनीश गुरबानी आणि यश ठाकूर यांनीही शेष भारताच्या गोलंदाजांना चांगली झुंज देत ३९ धावांची भागीदारी केली. अखेर अंकित राजपूतने ठाकूरला १० धावांवर पायचीत केले. त्यामुळे विदर्भाचा डाव ४२५ धावांवर संपुष्टात आला आणि त्यांना ९५ धावांची आघाडी मिळाली.

शेष भारताची दुसर्‍या डावात चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे सलामीवीर अनमोलप्रीत सिंग (६) आणि मयांक अगरवाल (२७) झटपट माघारी परतल्याने विदर्भाची २ बाद ४६ अशी अवस्था झाली होती. मात्र यानंतर पहिल्या डावात शतक करणार्‍या हनुमा विहारी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने शेष भारताचा डाव सावरत ५६ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे दिवसअखेर त्यांची २ बाद १०२ अशी धावसंख्या आहे. विहारी ४० आणि रहाणे २५ धावांवर नाबाद आहे.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

शेष भारत : ३३० आणि २ बाद १०२ (हनुमा विहारी ४०*, अजिंक्य रहाणे २५*; अक्षय वखरे १/३१, आदित्य सरवटे १/४५) वि. विदर्भ : ४२५ (अक्षय कर्णेवार १०२, अक्षय वाडकर ७३; राहुल चहार ४/११२, कृष्णप्पा गौथम २/३३).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -