IPL 2020 : धोनीच्या चेन्नईची हैदराबादवर मात; मोसमातील तिसरा विजय

शेन वॉटसन (४२) आणि अंबाती रायडू (४१) यांनी चांगली फलंदाजी केली. 

bravo

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आज झालेल्या आयपीएलच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा २० धावांनी पराभव केला. यंदा चेन्नईला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले आहे. हा त्यांचा यंदाच्या मोसमात आठ सामन्यांतील केवळ तिसरा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे ६ गुण झाले असून हैदराबादच्या खात्यातही ६ गुण आहेत. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६७ अशी धावसंख्या केली होती. याचा पाठलाग करताना हैदराबादला ८ बाद १४७ धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईने सामना जिंकला.

धोनी, जाडेजाची फटकेबाजी

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. चेन्नईच्या डावाची सुरुवात फॅफ डू प्लेसिसच्या साथीने सॅम करनने केली. करनची सलामीवीर म्हणून खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याने या संधीचा चांगला फायदा घेत २१ चेंडूत ३१ धावा केल्या. डू प्लेसिसला खातेही उघडता आले नाही. या दोघांना संदीप शर्माने बाद केले. यानंतर शेन वॉटसन (४२) आणि अंबाती रायडू (४१) यांनी चांगली फलंदाजी करत ८१ धावांची भागीदारी रचली. हे दोघे बाद झाल्यावर धोनी (२१) आणि रविंद्र जाडेजा (२५) यांनी फटकेबाजी केल्याने चेन्नईने २० षटकांत ६ बाद १६७ अशी धावसंख्या उभारली.

विल्यमसनची एकाकी झुंज

याचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर (९) आणि मनीष पांडे (४) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. केन विल्यमसनने ३९ चेंडूत ५७ धावांची खेळी करत हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला जॉनी बेअरस्टो (२३) आणि प्रियम गर्ग (१६) यांनी काही काळ साथ दिली. मात्र, विल्यमसन मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्यातच हैदराबादच्या इतर फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. त्यामुळे हैदराबादला २० षटकांत ८ बाद १४७ धावाच करता आल्या. चेन्नईकडून करण शर्मा आणि ब्रावोने २-२ विकेट घेतल्या.