भारताचे आव्हान संपुष्टात

चीन ओपन बॅडमिंटन

Mumbai
Sai Praneeth

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू साई प्रणितला चीन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तीन गेम रंगलेल्या सामन्यात त्याच्यावर जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणार्‍या इंडोनेशियाच्या अँथनी सिनीसुका गिंटिंगने मात केली. साई प्रणितच्या या पराभवामुळे भारताचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

मागील महिन्यात बासेल येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत साई प्रणितने ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले होते. जागतिक स्पर्धेत पदक मिळवणारा प्रणित हा ३६ वर्षांत पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू होता. मात्र, त्याला चीन ओपनमध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. त्याचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अँथनी सिनीसुका गिंटिंगने २१-१६, ६-२१, १६-२१ असा पराभव केला. या सामन्याआधी या दोन खेळाडूंमध्ये ५ सामने झाले होते, ज्यापैकी ३ सामने प्रणितने आणि २ सामने गिंटिंगने जिंकले होते. या सामन्याचीही प्रणितने अप्रतिम सुरुवात केली. त्याने पहिल्या गेमच्या मध्यंतराला ११-३ अशी मोठी आघाडी मिळवली. गिंटिंगने पुनरागमन केल्याने प्रणितकडे ११-१४ अशी अवघ्या तीन गुणांची आघाडी होती. परंतु, यानंतर प्रणितने आपला खेळ उंचावत हा गेम २१-१६ असा आपल्या खिशात टाकला.

दुसर्‍या गेममध्ये मात्र प्रणितला चांगला खेळ करता आला नाही. याचा गिंटिंगने फायदा घेत मध्यंतराला ११-५ अशी भक्कम आघाडी मिळवली. मध्यंतरानंतर गिंटिंगने अधिक आक्रमक खेळ केल्याने प्रणितला केवळ १ गुण मिळवता आला. प्रणितने हा गेम ६-२१ असा मोठ्या फरकाने गमावला. त्यामुळे हा सामना तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये गेला. या गेमच्या सुरुवातीला २-६ असा पिछाडीवर पडलेल्या प्रणितने पुनरागमन करत मध्यंतराला ११-७ अशी आघाडी घेतली. मात्र, गिंटिंगने सलग ६ गुण कमावले आणि १३-१२ आघाडी मिळवली. त्यानंतर त्याने आपली आघाडी २०-१६ अशी वाढवली. पुढील गुणही गिंटिंगनेच मिळवत हा गेम २१-१६ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली. आता उपांत्य फेरीत त्याचा डेन्मार्कच्या अँडर्स अँटॉन्सनशी सामना होईल.

भारतीय खेळाडूंची निराशजनक कामगिरी
भारताच्या प्रमुख खेळाडूंना या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी करणार्‍या पी.व्ही.सिंधूचा दुसर्‍या फेरीत पराभव झाला. सायना नेहवालवर पहिल्या आणि पारुपल्ली कश्यपवर दुसर्‍या फेरीत स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच दुहेरीत भारताच्या एकाही जोडीला उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही.