घरक्रीडासात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक

सात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक

Subscribe

चीन ओपन बॅडमिंटन

भारताची पुरुष दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग चेट्टी यांनी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे त्यांनी भारताचेही या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. सात्विक-चिरागने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनची जोडी ली जून हुई आणि लिऊ यु चेनवर २१-१९, २१-१५ अशी सरळ गेममध्ये मात केली. आता उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर अव्वल सीडेड इंडोनेशियाच्या मार्कस फर्नाल्डी गिदोन आणि केविन संजया सुकमुल्जोचे आव्हान असेल. मागील महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात याच इंडोनेशियन जोडीने सात्विक-चिरागचा पराभव केला होता.

चीन ओपनच्या पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग आणि ली जून हुई-लिऊ यु चेन यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिला गेम चुरशीचा झाला. या गेमच्या सुरुवातीला दोन्ही जोड्यांनी चांगला खेळ केला. त्यामुळे त्यांच्यात ८-८ अशी बरोबरी होती. मात्र, सात्विक-चिरागने आक्रमक खेळ करत मध्यंतराला ११-८ अशी आघाडी मिळवली. पुढे त्यांच्याकडे १३-१६ अशी आघाडी होती, पण चिनी जोडीने सलग चार गुण मिळवत १७-१६ अशी आघाडी घेतली. मात्र, सात्विक-चिरागने पुनरागमन करत २०-१८ अशी आघाडी मिळवली आणि अखेर हा गेम २१-१९ असा जिंकला.

- Advertisement -

दुसर्‍या गेममध्येही सात्विक-चिरागने दमदार सुरुवात केली. त्यामुळे चिनी जोडी ७-१० अशी पिछाडीवर पडली. या गेमच्या मध्यंतराला सात्विक-चिरागकडे ११-१० अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. त्यानंतर १२-१२ अशी बरोबरी असताना सात्विक-चिरागने सलग तीन गुण जिंकत १५-१२ अशी आघाडी घेतली. पुढील ९ पैकी ६ गुण मिळवत सात्विक-चिरागने हा गेम आणि सामना जिंकला. चिरागने या सामन्यात नेटजवळ फारच उत्कृष्ट खेळ केला.

सात्विक-चिराग आणि ली जून हुई-लिऊ यु चेन यांच्यातील हा तिसरा सामना होता. भारतीय जोडीने चिनी जोडीवर एप्रिलमध्ये झालेल्या थायलंड ओपन स्पर्धेत मात केली होती, पण जूनमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, चीन ओपनमध्ये पुन्हा एकदा सात्विक-चिरागला विजय मिळवण्यात यश आले.

- Advertisement -

सलग दुसर्‍यांदा उपांत्य फेरीत!

चीन ओपनची उपांत्य फेरी गाठणार्‍या सात्विक-चिरागने यावर्षी अप्रतिम खेळ केला आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये झालेल्या थायलंड ओपनमध्ये आपले पहिले सुपर ५०० स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. मागील महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. त्यामुळे त्यांची एखाद्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची दुसरी वेळ होती. तसेच यंदा त्यांची एखाद्या स्पर्धेची किमान उपांत्यपूर्व गाठण्याची तिसरी वेळ होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -