घरक्रीडासायना पहिल्याच फेरीत गारद

सायना पहिल्याच फेरीत गारद

Subscribe

चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

भारताची आघाडीची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला चीन ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. मागील महिन्यात स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या पी.व्ही. सिंधूला, तसेच पुरुषांमध्ये कांस्यपदक पटकावणार्‍या साई प्रणितला मात्र चीन ओपनची विजयी सुरुवात करण्यात यश आले.

माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानने १०-२१, १७-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. ४४ मिनिटे चाललेल्या या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सायनाला चांगला खेळ करता आला नाही. दुसर्‍या गेममध्ये सायनाने झुंज दिली. परंतु, बसाननने आपला खेळ योग्य वेळी उंचावत हा गेम आणि सामना जिंकला. जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी असलेल्या बुसाननविरुद्धचा हा सायनाचा सलग दुसरा पराभव होता. सायनाला यावर्षी दुखापतींनी सतावले आहे. तिने वर्षाच्या सुरुवातीला झालेली इंडोनेशियन ओपन स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्यानंतर तिला एकाही स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आलेली नाही.

- Advertisement -

विश्व विजेत्या सिंधूने मात्र आपला दमदार फॉर्म कायम राखला आहे. पाचव्या सीडेड सिंधूने चीन ओपनमधील महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ली शुइरुईवर २१-१८, २१-१२ अशी मात केली. या दोघींमध्ये आतापर्यंत ७ सामने झाले असून सिंधूचा हा चौथा विजय होता. हा सामना केवळ ३४ मिनिटे चालला.

पुरुषांमध्ये भारताचा आघाडीचा खेळाडू साई प्रणितलाही दुसर्‍या फेरीत प्रवेश करण्यात यश आले. त्याने या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या सुपन्यू अविहिंगसॅनॉनचा रंगतदार सामन्यात २१-१९, २१-२३, २१-१४ असा पराभव केला.

- Advertisement -

पोनप्पा-सिक्की रेड्डीची आगेकूच

अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या भारताच्या जोडीने चीन ओपन स्पर्धेत महिला दुहेरीच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत तैवानच्या चेंग ची या आणि ली चीह चेन या जोडीने अर्ध्या सामन्यातून माघार घेतली. या सामन्यातील पहिला गेम पोनप्पा-सिक्की रेड्डीने २१-१३ असा जिंकला होता, तर दुसर्‍या गेममध्ये त्यांच्याकडे ११-८ अशी आघाडी होती. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी या भारताच्या जोडीवर जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि इसाबेल हेरट्रीच यांनी २१-१२, २३-२१ अशी मात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -