घरक्रीडा‘चोकर्स’चा टॅग पुसण्यात येणार यश?

‘चोकर्स’चा टॅग पुसण्यात येणार यश?

Subscribe

दक्षिण आफ्रिकेचा संघ म्हणजे मागील १५-२० वर्षांतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक. मात्र, या संघाला अजून एकदाही क्रिकेट विश्वचषक जिंकता आलेला नाही. १९७५ ते १९८७ पर्यंत हा संघ आयसीसीचा सदस्य नसल्याने त्यांना विश्वचषकात खेळता आले नाही. त्यामुळे १९९२ मध्ये आपला पहिला विश्वचषक खेळणार्‍या द.आफ्रिकेच्या संघाला ७ पैकी ६ विश्वचषकांत बाद फेरी गाठण्यात यश आले होते. तसेच त्यांनी ४ वेळा उपांत्य आणि २ वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र, त्यांना एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यातच दबावाच्या परिस्थितीत त्यांना आपला खेळ उंचावण्यात अपयश आल्याचे वारंवार पहायला मिळाले आहे. त्यामुळे या संघाला ‘चोकर्स’ या नावाने संबोधले जाते, परंतु आता त्यांना या विश्वचषकात अखेरच्या फेर्‍यांमध्ये चांगली कामगिरी करत ‘चोकर्स’चा टॅग पुसून टाकण्याची संधी आहे.

२०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये या संघाने दमदार कामगिरी केली होती. या संघाने ६ पैकी ४ सामने जिंकत बाद फेरीत प्रवेश केला आणि उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेचा ९ विकेटने धुव्वा उडवला होता. त्यामुळे हा संघ पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे, असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. मात्र, याआधीच्या विश्वचषकांप्रमाणेच यावेळीही दबावाच्या क्षणी त्यांना चांगला खेळ करण्यात अपयश आले. उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने त्यांचा पराभव केल्याने त्यांना पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यात अपयश आले. त्यानंतर या संघात काही बदल झाले आहेत. मागील वर्षी त्यांचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या विश्वचषकात इतर खेळाडूंना आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

- Advertisement -

३० मेपासून इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक जिंकण्यासाठी द.आफ्रिकेला प्रबळ दावेदार मानले जात नसले, तरी या संघाने २०१८च्या सुरुवातीपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांनी या दीड वर्षांमध्ये ६ एकदिवसीय मालिका खेळल्या असून, त्यापैकी ५ मालिका जिंकण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे या संघाविरुद्ध खेळताना इतर संघांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. या संघामध्ये कर्णधार फॅफ डू प्लेसी, कागिसो रबाडा, इम्रान ताहिर, क्विंटन डी कॉक, डेल स्टेन असे मॅचविनर खेळाडू आहेत, जे आपल्या या संघाला एकहाती सामना जिंकवून देण्यात सक्षम आहेत. त्यामुळे हा संघ या विश्वचषकाची किमान उपांत्य फेरी गाठेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यानंतर ते कशी कामगिरी करतात याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

जमेची बाजू – द.आफ्रिकेच्या या संघात ७ (फॅफ डू प्लेसी, हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, डेविड मिलर, इम्रान ताहिर, डेल स्टेन) असे खेळाडू आहेत, जे मागील विश्वचषकातही खेळले होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा इतर खेळाडूंना फायदा मिळणार आहे. या संघाची वेगवान गोलंदाजीची फळी (लुंगी इंगिडी, क्रिस मॉरिस, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, डेल स्टेन) खूपच मजबूत आहे. तसेच त्यांना इम्रान ताहिरच्या लेगस्पिनचीही चांगली साथ मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत ताहिर (१७ सामन्यांत २६ विकेट) अव्वल स्थानी तर रबाडा (१२ सामन्यांत २५ विकेट) दुसर्‍या स्थानी होता. त्यामुळे इंग्लंडच्या सपाट खेळपट्ट्यांवरही या गोलंदाजांविरुद्ध धावा करणे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अवघड जाणार आहे.

- Advertisement -

कमकुवत बाजू – या संघाची फलंदाजी ही त्यांची कमकुवत बाजू आहे, असे म्हणता येईल. फॅफ डू प्लेसी आणि क्विंटन डी कॉक वगळता इतर खेळाडूंच्या प्रदर्शनात सातत्याचा अभाव आहे. हाशिम आमला या अनुभवी फलंदाजाला मागील काही काळात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याला या विश्वचषकासाठी संघात स्थान मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, त्याच्या गाठीशी असलेला अनुभव लक्षात घेता निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. तसेच या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार्‍या जेपी ड्युमिनीला काही महिने दुखापतीमुळे मैदानाबाहेर रहावे लागले होते. मात्र, त्याने यावर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध पुनरागमन करत २ सामने खेळले होते. त्यामुळे विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी त्याला फारसा सराव करण्याची संधी मिळालेली नाही आणि याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम होतो का हे पहावे लागेल.

विश्वचषकासाठी द.आफ्रिकन संघ : फॅफ डू प्लेसी (कर्णधार), हाशिम आमला, क्विंंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जेपी ड्युमिनी, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी इंगिडी, क्रिस मॉरिस, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, डेल स्टेन, इम्रान ताहिर, रॅसी वन डर डूसेन.

(खेळाडूवर लक्ष)
कागिसो रबाडा [गोलंदाज]
एकदिवसीय सामने : ६६
विकेट : १०६
सरासरी : २६.४३
इकोनॉमी : ४.९८
सर्वोत्तम : ६/१६

विश्वविजेते – एकदाही नाही

इतिहास विश्वचषकाचा 

१९७९ – क्रिकेट विश्वचषकाचे दुसरे पर्वही इंग्लंडमध्येच पार पडले आणि १९७५ प्रमाणेच ही स्पर्धाही प्रुडेंशियल चषक म्हणून ओळखली गेली. १९७५ विश्वचषकातही सहभाग घेतलेल्या यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका या ७ संघांसह कॅनडा या नव्या संघामध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. या विश्वचषकात भारताने गतविजेता वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, श्रीलंका या संघांविरुद्ध साखळी सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या विश्वचषकाचा अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या संघांमध्ये झाला. या सामन्यात व्हीव रिचर्ड्सच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ६० षटकांत ९ विकेट गमावत २८६ धावा केला. याचा पाठलाग करताना जोएल गार्नरने घेतलेल्या ५ विकेटमुळे इंग्लंडचा डाव १९४ धावांत संपुष्टात आला आणि वेस्ट इंडिजने सलग दुसर्‍यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

-(संकलन – अन्वय सावंत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -