कोहली-रोहितमधील वादाचे वृत्त निरर्थक!

Mumbai
Ravi Shashtri
रवी शास्त्री

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याचे वृत्त समोर आले होते. या दोन प्रमुख खेळाडूंमधील मतभेदांमुळे भारतीय संघात दोन गट पडल्याचेही म्हटले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौर्‍याला रवाना होण्यापूर्वी कोहली, हे वादाचे वृत्त खोटे असल्याचे म्हणाला होता.

तसेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आमच्या ड्रेसिंग रूममध्ये वाद-विवादांना जागा नाही, असे सांगितले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा कोहली आणि रोहित यांच्यातील वादाच्या वृत्ताबाबत भाष्य केले आहे. या दोघांमध्ये वाद असता तर रोहित विश्वचषकात इतका चांगला कशासाठी खेळला असता, असा प्रश्न शास्त्री यांनी उपस्थित केला.

मागील पाच वर्षे मी या ड्रेसिंग रुममध्ये आहे. आमचे खेळाडू कशाप्रकारे खेळतात, ते किती मेहनत घेतात, हे मी पाहिले आहे. कोहली आणि रोहितमधील वादाचे वृत्त निरर्थक आहे. या दोघांमध्ये जर वाद असता, तर रोहितने विश्वचषकात पाच शतके लगावली असती का? विराटने इतकी उत्कृष्ट कामगिरी केली असती का? त्या दोघांमध्ये वारंवार चांगली भागीदारी झाली असती का?, असे शास्त्री एका मुलाखतीत म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, एका संघामध्ये १५ खेळाडू असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी सर्वांची मते समान असतील असे नाही. सर्व खेळाडूंनी समान विचार केलेला मला चालणार नाही. प्रत्येक खेळाडूला नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत. त्यांनी चर्चा केली पाहिजे. तुम्ही खेळाडूंना मोकळीक दिली पाहिजे. काही वेळा संघातील सर्वात ज्युनियर खेळाडूला चांगली कल्पना सुचते, ज्याचा आम्ही विचारही केलेला नसतो. मात्र, दोन खेळाडूंची मते वेगळी आहे, म्हणजे त्यांच्यात वाद आहे असे म्हणणे चुकीचे आहे.