घरक्रीडाते सध्या काय करतात?

ते सध्या काय करतात?

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व खेळ बंद आहेत. आयओसीने यंदा होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही स्पर्धा २३ ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत पार पडणार आहे. त्यामुळे बऱ्याच खेळाडूंना सरावासाठी अधिक वेळ मिळाला आहे, तर फॉर्मात असलेल्या खेळाडूंना या विश्रांतीचा फारसा आनंद झालेला नाही. यापैकी काही खेळाडू या विश्रांतीचा कसा उपयोग करत आहेत, यावर टाकलेली ही एक नजर.  

करोना विषाणूने जगात हाहाकार माजवला आहे. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने खेळांच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. यावर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिककडे सर्व क्रीडा रसिकांचे लक्ष होते. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलणे भाग पडले. आता ही स्पर्धा २०२० ऐवजी २०२१ मध्ये होणार आहे.

भारतीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी करेल अशी सर्वांची अपेक्षा होती. भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये एकूण ६ पदके पटकावली होती. ही भारताची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी! परंतु, याव्यतिरिक्त भारताला कधीही ५ पेक्षा जास्त पदके मिळवण्यात यश आलेले नाही. यंदा मात्र भारताचे खेळाडू, त्यातही खासकरुन नेमबाज दमदार कामगिरी करतील अशी भारतीय चाहत्यांना अपेक्षा होती. आता ही ‘जबरदस्तीने’ मिळालेली विश्रांती बऱ्याच खेळाडूंच्या पथ्यावर पडू शकेल.

- Advertisement -

भारताची युवा नेमबाज मनू भाकर हा वेळ ऑनलाईन नेमबाजी स्पर्धा खेळून घालवत आहे. माजी भारतीय नेमबाज शिमॉन शरीफ यांच्या संकल्पनेतून प्रथमच झालेल्या ऑनलाईन स्पर्धेत अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय नेमबाजांनी भाग घेतला आणि यात मनूचाही समावेश होता. “ऑनलाईन नेमबाजीमुळे आम्हाला एकत्रितपणे स्पर्धेची वातावरणनिर्मिती अनुभवता आली. खेळ जगभरातील लोकांना जोडतो, हेच या माध्यमातून साध्य करता आले”, असे मनू या ऑनलाईन स्पर्धेबाबत म्हणाली होती. १८ वर्षीय पिस्तूल नेमबाज मनूने राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा, नेमबाजी वर्ल्डकप यांमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे गेले असले तरी मनूने घरीच जोरदार सराव सुरु ठेवला आहे. तसेच ती दोरी उड्या, योग यांच्या माध्यमातून फिट राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून नक्कीच सुवर्णपदकाची अपेक्षा केली जाऊ शकते.

भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने विक्रमी सहा वेळा जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र, तिला अजून ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करता आलेली नाही. ती यंदाच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यास उत्सुक होती, पण आता तिला एक वर्ष थांबावे लागणार आहे. मात्र, काहीही झाले तरी भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्याचा ३८ वर्षीय मेरीचा मानस आहे. ती सध्या मिळालेल्या विश्रांतीचा वापर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि सराव करण्यासाठी करत आहे. “या विश्रांतीचा खेळावर फारसा परिणाम होईल असे मला वाटत नाही, कारण माझ्या गाठीशी खूप अनुभव आहे”, असे मेरी एका मुलाखतीत म्हणाली होती. त्यामुळे पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये मेरी ‘गोल्डन पंच’ मारण्यास सज्ज असेल हे नक्की.

- Advertisement -

भारताचे काही खेळाडू ऑलिम्पिकच्या तयारीसाठी परदेशात जाऊन सराव करत होते. भारताचा २२ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राही त्यांच्यापैकीच एक! नीरज तुर्कीमध्ये सराव करत होता. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने बऱ्याच देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले होते आणि या देशांमध्ये तुर्कीचाही समावेश होता. त्यामुळे नीरजला मायदेशी परतण्यास सांगण्यात आले. तेव्हापासून तो पटियाला येथे विलगीकरणात होता. तसेच तो आपला फिटनेस राखण्याचा प्रयत्न करत होता. नीरजने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आणि एशियाडमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.

त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरजकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र, कोपरावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्याला संपूर्ण २०१९ मोसमाला मुकावे लागले होते. यातून सावरत त्याने दमदार पुनरागमन केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ८५ मीटर किंवा त्यापेक्षा लांब भाला फेकणे गरजेचे होते. यावर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत ८७.८६ मीटर लांब भाला फेकत नीरज ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. फिट झाल्यापासून नीरजला सराव करण्यासाठी आणि पुन्हा फॉर्मात येण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे जाणे त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.

नीरजप्रमाणे ऑलिम्पिक एका वर्षाने लांबणीवर पडणे कुस्तीपटू सुशील कुमारच्याही पथ्यावर पडू शकेल. ३७ वर्षीय सुशील हा ऑलिम्पिकमध्ये दोन पदके (२००८ कांस्य, २०१२ रौप्य) मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू! त्याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करणे अवघड जाणार होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर आयओसीने टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरण्याची तारीख २९ जून, २०२१ पर्यंत वाढवली. त्यामुळे सुशीलला या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी आणखी एक वर्ष मिळाले आहे. सुशील ७४ किलो वजनी गटात खेळतो आणि या गटातून अजून कोणताही कुस्तीपटू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही. मात्र, ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सुशीलला जुना प्रतिस्पर्धी नरसिंग यादवला धूळ चारावी लागू शकेल. जुलै महिन्याच्या अखेरीस नरसिंगवर लावण्यात आलेली चार वर्षांच्या बंदीची शिक्षा संपुष्टात येणार असल्याने त्यालाही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे दोघांपैकी या संधीचे सोने कोण करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -