घरक्रीडादेणगी...फक्त ट्रोलिंगची!

देणगी…फक्त ट्रोलिंगची!

Subscribe

केंद्र आणि राज्य सरकार करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. करोनाविरुद्ध लढ्यात सरकारला सर्वच स्तरांतून मदत मिळत असून भारतातील क्रीडापटू आणि क्रीडा संघटनाही मागे नाहीत. मात्र, सोशल मीडियावर खेळाडूंनी, त्यातही क्रिकेटपटू आणि क्रिकेट संघटनांनी दिलेल्या देणगीविषयी विशेष चर्चा रंगताना दिसते. बीसीसीआयने पंतप्रधान सहायता निधीला ५१ कोटींची देणगी दिली. मात्र, सोशल मीडियावरील 'ट्रोल' कंपनीला ही मदत पुरेशी नव्हती. बीसीसीआयनंतर नेटिझन्सनी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावरही निशाणा साधला. आपण काहीच करायचे नाही आणि दुसऱ्यावर सोशल मीडियावर टीका करायची हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे.    

सध्या टी. व्ही, ई-पेपर, बातम्यांच्या वेबसाईट यांच्यावर केवळ एकाच गोष्टीविषयी वाचायला, ऐकायला मिळते. ते म्हणजे करोना. चीनमधून पसरलेला हा छोटासा विषाणू आज जगात हाहाकार माजवत आहे. करोनामुळे हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर लाखोंना या विषाणूची लागण झाली आहे. जगातील मोठ्या-मोठ्या महासत्ताही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरत आहेत. भारतामध्ये करोनाचे बरेच रुग्ण सापडले आहेत आणि काहींनी आपले प्राण गमावले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकार करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण देशात लॉकडाऊनही करण्यात आले. प्रशासन अजूनही बरीच खबरदारीची पावले उचलत आहे. त्यांना या कठीण काळात वैद्यकीय सुविधांसह आर्थिक मदतही गरजेची आहे. करोनाविरुद्ध लढ्यात सरकारला सर्वच स्तरांतून मदत मिळत असून भारतातील क्रीडापटू आणि क्रीडा संघटनाही मागे नाहीत. प्रत्येक जण आपल्यापरीने केंद्र आणि राज्य सरकारला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, असे असतानाही सोशल मीडियावर खेळाडूंनी, त्यातही क्रिकेटपटू आणि क्रिकेट संघटनांनी दिलेल्या देणगीविषयी विशेष चर्चा रंगताना दिसते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून ओळखली जाते. बीसीसीआयलाही आपण किती शक्तिशाली आहोत, हे दाखवायला आवडते. करोनाविरुद्धच्या लढ्यात इतर संघटनांनी मदतनिधी दिल्यानंतर बीसीसीआय किती आणि कधी मदत करणार याकडे नेटिझन्सचे लक्ष होते. अखेर शनिवार, २८ मार्चला बीसीसीआयने पंतप्रधान सहायता निधीला ५१ कोटींची देणगी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोशल मीडियावरील ‘ट्रोल’ कंपनीला ही मदत पुरेशी नव्हती. याच काळात एका रेल्वे कामगार संघटनेने ७० कोटींची मदत जाहीर केल्याने ट्विटरवर ‘शेम ऑन बीसीसीआय’ असा हॅशटॅग वापरत लोकांनी सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेला ट्रोल करण्यास सुरुवात केली. दोन संघटनांच्या मदत निधीमध्ये तुलना केली जाऊ लागली. परंतु, एका गोष्टीकडे बहुदा या ट्विटरातींचे लक्ष गेले नाही.
रेल्वेच्या एका कामगार संघटनेने ७० कोटी इतक्या मोठ्या रकमेची देणगी दिली ही बाब कौतुकास्पदच आहे. त्यांनी हा निधी उभारला तो आपल्या कामगारांच्या एका दिवसाच्या वेतनातून. बीसीसीआयने मात्र आपल्या करारबद्ध खेळाडूंचे पूर्ण मानधन दिले आणि खेळाडूंना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, हेही स्पष्ट केले. आता आपणही या दोन संघटनांच्या देणगीत तुलना करणार आहोत का, तर नक्कीच नाही. मुळात देणगी ही स्वेच्छेने दिली जाते. त्यामुळे कोण, किती देणगी देणार हे दुसऱ्याने ठरवणे कितपत योग्य आहे?
बीसीसीआयनंतर नेटिझन्सच्या निशाण्यावर आले ते म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. कोहली आणि धोनी म्हणजे भारतीय खेळांतील सर्वात लोकप्रिय चेहरे. क्रिकेट आवडो वा न आवडो, भारतातील प्रत्येकाला या दोघांविषयी माहिती नक्कीच आहे. विराट हा सध्याच्या घडीला युथ आयकॉन म्हणून ओळखला जातो. भारतातील तरुणांमध्ये त्याची खूप ‘क्रेज’ आहे, असे म्हणणे वावगे ठरु नये. त्यामुळे त्याच्याकडून लोकांच्या काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मग ट्रोलिंग सुरु!
विराट आणि अभिनेत्री असलेली त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मिळून अगदी सुरुवातीपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना घरीच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन केले. मात्र, नेटिझन्ससाठी हे पुरेसे नव्हते. इतर खेळांतील खेळाडू आपल्यापरीने मदत केली, तसेच विराटचे भारतीय संघातील माजी सहकारी सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यांनीही देणगी दिली. विराटने मात्र प्रशासनाला आर्थिक मदत करण्यासाठी वेळ घेतला. मग काय, कोहलीवर टीका होणारच होती. अखेर काही दिवसांपूर्वी त्याने आणि अनुष्काने मिळून पंतप्रधान, तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबाबतची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली. मात्र, त्यात त्यांनी किती देणगी दिली, हे स्पष्ट केले नव्हते आणि त्यांना ट्रोल करत राहण्यासाठी इतके कारण पुरेसे होते.
दुसरीकडे करोनाविरुद्ध लढ्यात धोनीने एक लाखांची मदत केल्याचे वृत्त समोर आले होते. धोनीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. मात्र, तरीही “धोनीसारखा व्यक्ती जो इतक्या कंपन्यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे, ज्याची एकूण संपत्ती तब्बल ८०० कोटी रुपयांची आहे, तो इतक्या तोकड्या रकमेची मदत करुच कशी शकतो?”, असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जाऊ लागले. अखेर धोनीने एक लाखाची मदत केल्याची माहिती खोटी असल्याचे त्याची पत्नी साक्षीने स्पष्ट केले. तेव्हा कुठे नेटिझन्स शांत झाले.
सोशल मीडिया हे शाप आहे की वरदान, हा प्रश्न बरेचदा विचारला जातो. सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर हे नक्कीच वरदान आहे. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या माध्यमांमुळे जग खूप जवळ आले आहे. मात्र, याच गोष्टीचा बरेच जण गैरफायदा घेतात. या माध्यमांमुळे आपल्याला इतरांवर टीका करण्याची जणू मोकळीकच मिळाली असे त्यांना वाटू लागते आणि हे योग्य नाही. “मी देणगी दिली”, हे प्रत्येकाने सोशल मीडियावर जाहीर करणे गरजेचेच आहे का? एखाद्याला जर केलेली मदत सर्वांना सांगायची नसेल, तर त्याला तो अधिकार नाही का? कोणाला देशाची किती काळजी आहे, हे सोशल मीडियावरील लोक ठरवणार का? यांसारख्या प्रश्नांचा विचार होणे गरजेचे आहे, हे नक्की.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -