Sunday, August 9, 2020
Mumbai
29.1 C
घर क्रीडा क्रिकेट इज बॅक…इंग्लंड-विंडीज पहिली कसोटी आजपासून

क्रिकेट इज बॅक…इंग्लंड-विंडीज पहिली कसोटी आजपासून

तब्बल ११७ दिवसांनंतर क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपणार असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार आहे.

Southampton
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच खेळ मार्चपासून बंद होते आणि क्रिकेटही याला अपवाद नव्हता. परंतु, आता तब्बल ११७ दिवसांनंतर क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. बुधवारपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार असून यापैकी पहिला सामना बुधवारपासून साऊथहॅम्पटन येथे रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुट खेळणार नाही. त्याच्या ऐवजी अष्टपैलू बेन स्टोक्स इंग्लंडचे नेतृत्व करेल. कर्णधार म्हणून विजयी सुरुवात करण्याचे स्टोक्सचे लक्ष्य असेल.

नव्या नियमांनुसार होणारा पहिलाच सामना

कोरोनामुळे आयसीसीला खेळाच्या नियमांमध्ये काही बदल करणे भाग पडले. नव्या नियमांनुसार होणारा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीचा वापर करता येणार नाही. थुंकीचा वापर केल्यास सुरुवातीला दोनदा ताकीद देण्यात येईल आणि तिसऱ्यांदा ही कृती केल्यास दंड म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा प्रदान करण्यात येतील. थुंकीवर बंदी घातल्याने आता चेंडू स्विंग करताना गोलंदाजांना अडचण येऊ शकेल. इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि विंडीजचा किमार रोच हे गोलंदाज त्यांच्या स्विंगसाठी ओळखले जातात. आता नव्या नियमाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

तिन्ही सामने प्रेक्षकांविना

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचे तिन्ही सामने प्रेक्षकांविना होतील. तसेच खेळाडूंना विकेट घेतल्यावर हस्तांदोलन करता येणार नाही किंवा मिठ्याही मारता येणार नाहीत. टीम स्टोक्स आणि टीम बटलरमध्ये नुकताच सराव सामना पार पडला. यात अँडरसनने विकेट घेतल्यावर इतर खेळाडूंच्या कोपरावर कोपर मारत जल्लोष केला. आता हेच कसोटी सामन्यातही पाहायला मिळू शकेल.

इंग्लंडचे पारडे जड

या कसोटी मालिकेत यजमान इंग्लंडचे पारडे जड मानले जात आहे. इंग्लंडची कर्णधार स्टोक्स, रोरी बर्न्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, अँडरसन या खेळाडूंवर भिस्त आहे. मात्र, विंडीजकडेही कर्णधार जेसन होल्डर, शाई होप, रॉस्टन चेस, रोच यांसारखे मॅचविनर खेळाडू आहेत. मागील इंग्लंड दौऱ्यात लीड्सला झालेल्या कसोटीत शाई होपने दोन्ही डावांत शतके करत विंडीजला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडला सर्वोत्तम खेळच करावा लागेल.


प्रतिस्पर्धी संघ –

इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, झॅक क्रॉली, जो डेंली, ऑली पोप, जॉस बटलर, डॉम बेस, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, क्रिस वोक्स, मार्क वूड.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), जॉन कॅम्पबल, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शमार ब्रूक्स, रॉस्टन चेस, शेन डॉवरीच, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, शॅनन गेब्रियल, किमार रोच, जेर्मेन ब्लॅकवूड, एनक्रुमा बोनर, चेमार होल्डर, रेमॉन रिफर.

सामन्याची वेळ – दुपारी ३.३० पासून; थेट प्रक्षेपण – सोनी सिक्स