आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे क्रिकेट थोडे विचित्र वाटेल – संगकारा

Mumbai

करोनामुळे जवळपास दोन महिन्यांत क्रिकेटचा एकही सामना झालेला नाही. मात्र, आता काही देशांत लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यामुळे पुन्हा क्रिकेट सुरु करण्याबाबत चर्चा होत आहे. आता आयसीसीने क्रिकेट पुन्हा सुरु करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. क्रिकेट पुन्हा सुरु करतानाच सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आणि सर्व नियम पाळण्याचे आदेशही आयसीसीने दिले आहेत. आयसीसीच्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे क्रिकेट थोडे विचित्र वाटेल, पण सध्याच्या परिस्थितीत दुसरा पर्याय नाही, असे मत श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू कुमार संगकाराने व्यक्त केले.

आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे खेळाडूंना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागू शकेल. क्रिकेट खेळतानाही काही अडथळे येतील. क्रिकेट थोडे विचित्र दिसू शकेल. यामुळे काही लोक क्रिकेटकडे पाठही फिरवू शकतील. परंतु, आता दुसरा पर्याय नाही. सर्वांच्या आरोग्य आणि सुरक्षितेलाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. क्रिकेटपटूंना पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी आत्मविश्वास यावा, काही प्रेक्षक मैदानात यावे यासाठी आरोग्यालाच सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे, असे संगकाराने सांगितले.

आरोग्याला प्राधान्य दिले गेले नाही आणि सुरक्षित वातावरण नसेल, तर खेळाडूंच्या मनात पुन्हा क्रिकेट सुरुवात झाली पाहिजे का, आपण खेळले पाहिजे का अशा शंका सतत येत राहतील. त्यामुळे खूप काळजी घेणे आणि नवे नियम खेळाडूंच्याच हितासाठी आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे, असेही सांगकाराने नमूद केले.