घरक्रीडाउपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल राहणार सुरु?

उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल राहणार सुरु?

Subscribe

अपराजित भारताचा विंडीजशी सामना आज

क्रिकेट विश्वचषकात गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये सामना होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून 5 पैकी 4 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या स्पर्धेला सुरुवात होऊन जवळपास चार आठवडे झाल्यानंतरही भारतीय संघ अपराजित आहे. मात्र, असे असतानाही भारताने अजून उपांत्य फेरीत प्रवेश केलेला नाही. त्यांना उर्वरित 4 सामन्यांपैकी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. विंडीजने 6 पैकी केवळ 1 सामना जिंकला असला तरी मागील सामन्यात न्यूझीलंडने त्यांना केवळ 5 धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे गुरुवारी ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे होणार्‍या सामन्यात भारताला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.

भारताचा मागील शनिवारी तुलनेने दुबळ्या अफगाणिस्तानशी सामना झाला. अफगाणिस्तानला या स्पर्धेत एकही सामना न जिंकता आल्याने भारत त्यांना सहज धूळ चारेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माला पहिल्यांदा किमान अर्धशतक करण्यात अपयश आले. तसेच लोकेश राहुललाही चांगली फलंदाजी करता आला नाही. त्यामुळे मधल्या फळीवर मोठ्या धावा करण्याची जबाबदारी आली. कर्णधार कोहलीने दमदार फॉर्म कायम ठेवत 67 धावांची खेळी केली. मात्र, त्याला केदार जाधव (52 धावा) वगळता इतरांची साथ लाभली नाही. अनुभवी महेंद्रसिंग धोनीवर संथ खेळीमुळे (52 चेंडूत 28) बरीच टीका झाली. त्याच्यावर टीका करणार्‍यांमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. त्यामुळे विंडीजविरुद्ध धोनी कशी कामगिरी करतो याकडे सार्‍यांचे लक्ष असेल. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे अफगाणिस्तानविरुद्ध भारताला प्रथम फलंदाजी करताना 224 धावाच करता आल्या. मात्र, भारताची गोलंदाजीची फळी सध्याच्या घडीला सर्वोत्तम का मानली जाते हे त्यांनी पुन्हा एकदा दिले. खासकरून जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स आणि मोहम्मद शमीने हॅटट्रिकसह 4 विकेट्स घेत अफगाणी फलंदाजांना अडचणीत टाकले. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला. मात्र, विंडीजविरुद्ध जिंकायचे असल्यास फलंदाजांना आपली कामगिरी उंचावावी लागणार आहे.

- Advertisement -

वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला असला, तरी त्यांनी चांगली झुंज दिली. शेल्डन कॉटरलने अप्रतिम गोलंदाजी (4 विकेट्स) करत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. मात्र, केन विल्यमसनच्या शतकामुळे न्यूझीलंडने 291 धावा केल्या. याचा पाठलाग करताना क्रिस गेल आणि शिमरॉन हेटमायर यांनी अर्धशतके झळकावत विंडीजच्या डावाला आकार दिला, पण ते बाद झाल्यावर संघ अडचणीत सापडला. अष्टपैलू कार्लोस ब्रॅथवेट डावाची सूत्रे आपल्या हाती घेत एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. मात्र, 6 धावांची गरज असताना षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला आणि विंडीजचा पराभव झाला. या पराभवामुळे विंडीज उपांत्य फेरी गाठणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, या स्पर्धेत भारताला पराभूत करणारा पहिला संघ बनण्याची त्यांना संधी असल्याने ते या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतील.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार.

- Advertisement -

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रिस गेल, इव्हन लुईस, शाई होप (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, कार्लोस ब्रॅथवेट, अ‍ॅशले नर्स, किमार रोच, शेल्डन कॉटरल, ओशेन थॉमस, शॅनन गेब्रियल, फॅबियन अ‍ॅलन, डॅरेन ब्राव्हो, सुनील अँब्रिस

सामन्यावर पावसाचे सावट?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना मँचेस्टर येथे होणार आहे. मँचेस्टरमध्ये रविवारपासून पाऊस पडत आहे. खासकरून मंगळवारी पावसाने विशेष जोर धरला होता. त्यामुळे भारतीय संघाला इंडोर नेट्समध्ये सराव करावा लागला. मात्र, गुरुवारी पावसाची शक्यता कमी आहे. याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील सामना झाला होता. या सामन्यातही पावसाच्या व्यत्यय आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -