घरक्रीडाऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का!

ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का!

Subscribe

जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज कोण, हा प्रश्न विचारला असता सध्या भारताच्या जसप्रीत बुमराहचे नाव घेतले जाते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क त्याच्यापेक्षा फार मागे नाही. सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये उंचपुर्‍या, डावखुर्‍या स्टार्कने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत स्टार्क अव्वल स्थानी असून त्याने ७ सामन्यांत १९ विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच आपल्या वेग आणि स्विंगने सर्वच संघांच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले आहे. त्यामुळे या वर्ल्डकपमधील सर्व सामन्यांत त्याने किमान १ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. वर्ल्डकपमध्ये इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणेच स्टार्कही वेगळ्याच जिद्दीने आणि उत्साहाने खेळतो. त्यालाच मागील (२०१५) वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. त्याने त्या स्पर्धेच्या ८ सामन्यांत सर्वाधिक २२ विकेट्स घेतल्या होता. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वविजेतेपद मिळवले होते.

यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला प्रमुख दावेदार मानले जात नव्हते. मात्र, वर्ल्डकप सुरु होऊन आता जवळपास ४ आठवडे झाले असून या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. त्यांच्या दमदार कामगिरीचे श्रेय स्टार्कच्या भेदक गोलंदाजीला जाते. कोणत्याही सामन्यात विकेटची गरज असताना कर्णधार फिंचने चेंडू स्टार्कच्या हातात दिल्याचे पाहायला मिळाले आहे आणि स्टार्कनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावला आहे. या वर्ल्डकपमधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना २८८ धावाच करता आल्या. याचा पाठलाग करताना विंडीजचा संघ ३ बाद १४९ असा सुस्थितीत होता. मात्र, स्टार्कने झटपट ३ गडी बाद करत विंडीजच्या डावाला खिंडार पाडला आणि एकूण ४ विकेट्स घेत त्याने कांगारूंना विजय मिळवून दिला. मंगळवारी ऑस्ट्रेलियाची गाठ पडली ती पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असणार्‍या इंग्लंडशी. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडपुढे २८६ धावांचे आव्हान ठेवले होते. स्टार्कने फॉर्मात असलेल्या जो रूट आणि कर्णधार मॉर्गन यांना स्वस्तात माघारी पाठवत इंग्लंडला अडचणीत टाकले. बेन स्टोक्स (८९) एकाकी झुंज देत सामना इंग्लंडच्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, स्टार्कने उत्कृष्ट यॉर्कर टाकून त्याला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. हा या वर्ल्डकपमधील सर्वोत्तम चेंडू होता, असे अनेकांचे मत आहे.

- Advertisement -

२०१० मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या स्टार्कने आतापर्यंत ८२ सामन्यांत १६४ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु, हा वर्ल्डकप सुरु होण्याआधी त्याला दुखापतींनी ग्रासले होते. त्यामुळे त्याला ५-६ महिने मैदानाबाहेर राहावे लागले होते. वर्ल्डकपसाठी फिट होण्यासाठी त्याने यंदाच्या आयपीएलमध्येही भाग घेतला नव्हता. त्याच्या फिटनेस आणि मॅच प्रॅक्टिसबाबत साशंकता असल्यामुळे त्याच्याकडून या वर्ल्डकपमध्ये विशेष कामगिरीची अपेक्षा केली जात नव्हती. मात्र, त्याने १९ विकेट्स घेत आपली प्रतिभा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. आता ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवायचे असल्यास स्टार्कला पुढेही अशीच कामगिरी करावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -