घरक्रीडापाकची संधी हुकली?

पाकची संधी हुकली?

Subscribe

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वाद, तणाव जगजाहीर आहे. क्रिकेटच्या मैदानात हे संघ आमने-सामने आले की चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता असते. सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्येही या दोन संघांमध्ये सामना झाला, ज्यात पुन्हा भारताने बाजी मारली. हा सामना पाकिस्तानी खेळाडूंसाठी विसरण्याजोगा होताच. या सामन्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. मात्र, ज्या भारतीय संघामुळे त्यांच्यावर ही वेळ आली, त्याच संघाकडून त्यांना वर्ल्डकपमधील आपले आव्हान कायम राखण्यासाठी मदतीची गरज होती. मागील रविवारी झालेल्या इंग्लंड-भारत सामन्यावर पाकिस्तानचे विशेष लक्ष होते, कारण भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला असता. मात्र, भारताला हा सामना जिंकण्यात अपयश आले. त्यामुळे आता पाकिस्तानला आपला बांगलादेशविरुद्धचा अखेरचा सामना जिंकत, इंग्लंडच्या पराभवाची आशा करावी लागेल.

यजमान इंग्लंड आणि भारत या तुल्यबळ संघांमध्ये रविवारी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे सामना झाला. उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी मॉर्गनच्या इंग्लंडला हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. त्यांनी या सामन्यात झुंजार खेळ केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जॉनी बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर ३३७ धावांची मजल मारली. याचा पाठलाग करताना रोहित शर्माने शतक करूनही भारताला ३०६ धावाच करता आल्या. इंग्लंडच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारताला पहिल्या आणि अखेरच्या १० षटकांत फटकेबाजी करता आली नाही व त्यांचा पराभव झाला. हा सामना गमावल्यामुळे भारतीय संघावर पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी टीका केली. भारताने हा सामना मुद्दाम गमावला असा आरोपही त्यांनी केला. मात्र, जर पाकिस्तानच्या संघाने सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली असती, तर त्यांना आगेकूच करण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहण्याची वेळ आली नसती.

- Advertisement -

पाकिस्तानचा इतर संघांशी नाही, तर स्वतःशीच सामना असतो. ते कोणत्याही संघाचा पराभव करू शकतात आणि कोणत्याही संघाकडून पराभूत होऊ शकतात, असे ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग म्हणाला होता. याचाच प्रत्यय या वर्ल्डकपमध्ये आला आहे. पाकिस्तानला सुरुवातीच्या ५ सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकण्यात यश आले. वेस्ट इंडिजच्या संघाने या स्पर्धेत ८ सामन्यांपैकी १ सामना जिंकला आहे आणि हा विजय पाकिस्तानविरुद्ध आला होता. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघांनीही पाकचा पराभव केला. मात्र, यजमान इंग्लंडला धूळ चारत पाकने या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. तसेच त्यांनी शाहिन आफ्रिदी, हॅरिस सोहेल यासारख्या युवा खेळाडूंना संधी देत आपल्या मागील ३ सामन्यांत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानवर मात करत या स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. हे सामने जिंकल्यामुळे त्यांचे ८ सामन्यांत ९ गुण आहेत, तर ८ सामन्यांनंतर इंग्लंडच्या खात्यात १० गुण आहेत. आता इंग्लंडने बुधवारी होणार्‍या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केल्यास ते उपांत्य फेरी गाठतील आणि पाकिस्तान आगेकूच करणार नाही हे जवळपास निश्चित होईल. त्यामुळे पाकिस्तानने आपली कामगिरी सुधारत सामने जिंकायला कदाचित उशीर केला, असे वाटू लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -